![]()
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर (इस्लामपूर) शहरात एका 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मूळची सातारा जिल्ह्यातील असणारी ही विद्यार्थिनी ईश्वरपूर येथे शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. ओळखीचा गैरफायदा घेत दोन तरुणांनी तिला एका लॉजवर नेले आणि शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या अमानुष घटनेमुळे कॉलेज प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी या तरुणीशी असलेल्या पूर्वओळखीचा गैरफायदा घेतला. त्यांनी तिला गोड बोलून ईश्वरपूरमधील कामेरी रस्त्यावर असलेल्या एका लॉजवर नेले. तिथे पोहोचल्यावर तिच्या नकळत तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देण्यात आले. गुंगीचे औषध प्यायल्याने तरुणीला ग्लानी आल्यानंतर या दोन्ही मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. अत्याचार करून आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर घडलेला हा भयानक प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी तरुणीला दिली. आरोपींच्या या गंभीर धमक्यांना बळी न पडता पीडित तरुणीने प्रचंड धाडस दाखवत थेट ईश्वरपूर पोलिस ठाणे गाठले. तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग पोलिसांसमोर कथन केला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत पीडितेच्या तक्रारीवरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. शार्दुल विद्यापती पाटील (वय 21, रा. रेठरेधरण) आणि प्रथम सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) अशी या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची सूत्रे हलवली आणि संशयित आरोपी शार्दुल पाटील याला तात्काळ बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रथम पाटील हा सध्या फरार असून, पोलीस पथके त्याचा कसून शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास ईश्वरपूर पोलिसांकडून अत्यंत वेगाने आणि गांभीर्याने सुरू असून, फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
Source link
सांगलीत संतापजनक घटना:ईश्वरपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन केले गैरकृत्य