Headlines

894 प्रकरणांच्या चौकशीसाठी घरेलू कामगारांचा मोर्चा:कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सीटूची मागणी




घरेलू कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीटू संलग्न नांदेड जिल्हा घर कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर येथून निघालेल्या मोर्चानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या जुन्या तसेच नव्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, पात्र कामगारांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया सुलभ करावी, तसेच सन्मानधन, अपघात, मृत्यू, अंत्यविधी, प्रसूती, शिक्षण व कौशल्यविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. ८९४ प्रकरणांची चौकशी करा कामगार उपआयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या पत्रात नमूद ८९४ प्रकरणांतील कथित अनियमिततेची स्वतंत्र व सखोल चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली. संबंधित ९२६ लाभ अर्जांपैकी मंजूर ५८९ अर्जांची विशेष तपासणी करून वितरित झालेल्या ७९ लाख ६९ हजार रुपयांच्या निधीतील अपात्र अथवा बेकायदेशीर रक्कम वसूल करावी, तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी, संस्था, मध्यस्थ किंवा अन्य व्यक्तींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. योजनांच्या अर्जांवर विनाकारण विलंब होऊ नये यासाठी कामगार कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष सुरू करावा, तसेच योजनांची अधिकृत माहिती कामगारांना लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व घर कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड, कार्याध्यक्ष कॉ. उज्ज्वला पडालवार, सरचिटणीस कॉ. करवंदा गायकवाड, जमसं जिल्हाध्यक्ष कॉ. लता गायकवाड यांच्यासह सुभाषचंद्र गजभारे, मंगेश वट्टेवाड, राहुल नरवाडे, अरुणा जोगदंड, मंदा नेहारे, सुरेखा कांबळे आदींनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *