Headlines

14 महिने पूर्ण होण्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष बदलले:आ. अडसड ग्रामीण (मोर्शी), तर गुडदे शहराध्यक्षपदी‎




सुमारे १४ महिन्यांपूर्वी (मे २०२५) भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्षपदी डॉ. नितीन धांडे, तर ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची नियुक्ती केली होती. मात्र नियुक्तीपासून १४ महिने पूर्ण होण्यापूर्वीच पक्षाने त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांची ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी, तर नितीन गुडधे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे आदेश सोमवारी (दि. २९) जारी करण्यात आले. गतवर्षी भाजपने प्रथमच अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली होती. मेळघाट व दर्यापूर विधानसभा क्षेत्रासाठी माजी आमदार प्रभूदास भिलावेकर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, तर मोर्शी, तिवसा आणि धामणगाव रेल्वे या विधानसभा मतदारसंघांसाठी रविराज देशमुख यांची ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचवेळी डॉ. नितीन धांडे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र सोमवारी पक्षाने अचानक डॉ. नितीन धांडे आणि रविराज देशमुख या दोघांना त्यांच्या पदावरून मुक्त केले. विशेष म्हणजे, दुसरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रभूदास भिलावेकर यांना मात्र पदावर कायम ठेवण्यात आले आहे. शहराध्यक्ष उर्वरित, पान.४ बदलाचे कारण दडलेलेच! सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी महायुतीतील मित्रपक्षांच्या मदतीने पक्षाने महापौरपद कायम राखण्यात यश मिळवले. त्यानंतर अलीकडेच झालेल्या विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपने दिमाखदार विजय मिळवला. विशेष म्हणजे, पक्षाकडे असलेल्या नगरसेवकांच्या संख्येपेक्षा अधिक मते भाजप उमेदवाराला मिळाली आहे. अशा पार्श्वभूमीवर, शहराध्यक्ष आणि एका ग्रामीण जिल्हाध्यक्षाला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पदावरून हटविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या बदलामागील नेमके कारण मात्र पक्षाकडून अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या निर्णयामागे संघटनात्मक पुनर्रचना, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांची तयारी की अन्य काही राजकीय कारणे आहेत, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *