Headlines

199 बाधितांवर कारवाईचा बडगा:खुलताबाद ते शरणापूर टी-पॉइंट मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा




तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने अखेर आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी सकाळी १०.३० वाजता धडक मोहीम सुरू केली. खुलताबाद टी-पॉइंट येथील संजरी हॉटेलपासून ते शरणापूर टी-पॉइंटजवळील दौलताबाद मिलन मिठाईपर्यंत १९९ अतिक्रमणे हटविण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली असून, या कारवाईमुळे परिसरातील व्यावसायिक व अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महामार्ग कायदा व संबंधित नियमांनुसार महामार्गाची हद्द आणि नियंत्रित पट्टा मोकळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. कनिष्ठ अभियंता पुष्पा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ४ अधिकारी व कर्मचारी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ११ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. या संपूर्ण मोहिमेसाठी १ जेसीबी, १ सुपरवायझर आणि ७ मजुरांचे पथक सज्ज ठेवण्यात आले होते. सकाळी साडेदहा वाजता संजरी हॉटेल परिसरात प्रशासकीय पथक दाखल होताच महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या टपऱ्या, शेड, दुकाने आणि इतर अडथळ्यांवर कारवाई सुरू झाली. महामार्गाच्या दुतर्फा थाटली अनधिकृत बांधकामे महामार्गाच्या दुतर्फा झालेली अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, हॉटेल्स, अनधिकृत जोडरस्ते, जाहिरात फलक, पार्किंग आणि बांधकाम साहित्यामुळे रस्ता कमालीचा अरुंद झाला होता. याचा थेट परिणाम वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि भविष्यातील रस्ता रुंदीकरण प्रकल्पांवर होत होता. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी अनेक अतिक्रमणधारकांनी पथकाची वाट न पाहता स्वतःहून आपले साहित्य व अतिक्रमण काढून घेतले. ज्यांनी बांधकामे हटविण्यास टाळाटाळ केली, तेथे पथकाने जेसीबी आणि मजुरांच्या साहाय्याने कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *