Headlines

35 दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा:पिके वाचवण्यासाठी दिवसा वीज द्या!




मागील ३५ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जामोद, वडशिंगी आणि खेर्डा परिसरातील सुकणारी खरीप पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. मात्र, महावितरणकडून रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात असल्याने शेतात अंधारात सिंचन करताना शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्रीचा वीजपुरवठा बंद करून पूर्ववत सकाळी ६ ते सायंकाळी ५ या वेळेत दिवसा अखंडित वीज द्यावी. अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) वतीने उपकार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर आता गेल्या महिन्याभरापासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. तब्बल ३५ दिवस उलटूनही पाऊस न पडल्याने सोयाबीन, कापूस यांसारखी हातातोंडाशी आलेली पिके पाण्याच्या अभावाने सुकू लागली आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकरी विहिरी व बोअरवेलमधील उपलब्ध पाण्यावर पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महावितरणने ऑगस्ट महिन्यापासून वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलून ते रात्रीचे केले आहे. मे महिन्यापासून शेतपंपांसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ५ या वेळेत दिवसा वीजपुरवठा केला जात होता. आता पिके पूर्ण वाढलेल्या अवस्थेत असताना रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. परिसरात साप, विंचू व हिंस्र प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिवसा अखंडित वीज मिळाल्यास शेतकरी सुरक्षितपणे सिंचन करून पिके वाचवू शकतील. या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जामोद, वडशिंगी व खेर्डा सर्कलमधील सर्व गावांचा दिवसाचा वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करावा. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसन्नजीत पाटील, वर्षा वाघ, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, विश्वासराव भालेराव, इरफान खान, सिद्धार्थ हेलोडे, रामेश्वर मानकर, पंजाबराव वाघ, आशिष वायझोडे, दत्तात्रय डीवरे, सोपान आटोळे, दिगंबर तिजारे, तेजराव घुले, शत्रुघ्न कोकाटे, सुहास वाघ, अतुल मानकर यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पावसाने दडी मारली; सिंचनावर शेतीची भिस्त मागील ३५ दिवसांपासून पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोयाबीन, कापूस आणि अन्य पिकांना सध्या ओलाव्याची गरज असताना शेतकरी उपलब्ध जलस्रोतांच्या माध्यमातून सिंचन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती असल्याने सध्या पिके वाचविणे हेच शेतकऱ्यांसमोरील आव्हान आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *