Headlines

ससेवाडी येथील जंगलात साडेपाच हजार लिटरचा जीवनदायी पाणवठा:तहानलेल्या वनचरांना जाणीव फाउंडेशनचा मायेचा ओलावा‎




यंदाच्या उन्हाळ्याने सर्वच मर्यादा ओलांडल्या असून, अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उष्णतेचा फटका केवळ मानवालाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. जंगलातील नैसर्गिक जलस्त्रोत आटल्याने पाण्यासाठी वणवण करणाऱ्या वन्यजीवांसाठी सावेडीच्या जाणीव फाउंडेशनने संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. जेऊर परिसरातील ससेवाडीच्या जंगलात असलेला ५५०० लिटर क्षमतेचा विस्तीर्ण पाणवठा फाऊंडेशनच्या वतीने पूर्ण क्षमतेने भरण्यात आला असून, वनचरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट आहे. मानवाला पाणी पिण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत, मात्र जंगलातील पशु-पक्ष्यांना पाण्यासाठी मैलोंमैल भटकंती करावी लागत आहे. तहानेने व्याकूळ होऊन काही वन्यजीवांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. हीच भीषणता ओळखून जाणीव फाऊंडेशनच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता मोहिमेचे आयोजन केले. या उपक्रमात मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त ॲड. विक्रम वाडेकर, प्रदीप वाखुरे, विकास जोशी, सोहा जोशी तसेच ॲड. व इंजिनिअर कैलाश दिघे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान केले. या मोहिमेसाठी त्यांना विद्याधर पेटकर, मारुती पादीर आणि राघवेंद्र पेटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डोंगरकपारीतील कठीण भागात असलेल्या या पाणवठ्यात पाणी उपलब्ध करून दिल्याने परिसरातील हरणे, रानडुकरे आणि विविध पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीतून दिलेला हा संदेश जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही, तोपर्यंत हे पाणवठे नियमित भरले जातील, असा संकल्प फाउंडेशनने केला आहे. जाणीव फाउंडेशनचे आवाहन ^ उन्हाची तीव्रता मोठी असून मुके प्राणी-पक्षी पाण्यासाठी व्याकूळ आहेत. प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीवर, गॅलरीत किंवा अंगणात पाण्याची छोटी भांडी भरून ठेवावीत. निसर्ग वाचवण्यासाठी हा आपला छोटासा वाटा मोठे जीवदान ठरू शकतो. आपण सर्वांनी मिळून ही संवेदनशीलता जपावी. – अॅड. विक्रम वाडेकर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *