![]()
उसाला प्रतिटन पाच हजार दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद पैठण तालुक्यात उमटू लागले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनांतर्गत पैठण येथील शहागड फाटा चौकात शुक्रवारी रोखण्यात आलेली ऊस वाहतूक शनिवारी, दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. या आंदोलनामुळे साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या ऊस वाहतुकीवर परिणाम झाला असून रस्त्यावर ५५० हून अधिक उसाची वाहने उभी ठाकली आहेत. यंदाच्या हंगामात पावसाची अनियमितता आणि निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती यामुळे शेतीचे संपूर्ण अर्थकारण संकटात सापडले आहे. अशा हताश परिस्थितीत उसाला योग्य व अपेक्षित भाव मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. राज्यात उसाचा निश्चित दर जाहीर न करताच साखर कारखानदारांनी घाईघाईने गाळप हंगाम सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दराचा प्रश्न प्रलंबित असतानाच गाळप सुरू झाल्याने शेतकरी वर्ग अधिकच अडचणीत सापडला आहे. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्ञानदेव मुळे, पवन शिसोदे, अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, शिवाजी साबळे, रामेश्वर बावणे यांच्यासह शेकडो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. हतनूर नाक्यावरही शेतकरी आक्रमक उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखाना बंद आंदोलन पुकारले आहे. या अंतर्गत शुक्रवारी सोलापूर-धुळे महामार्गावरील हतनूर टोल नाक्यावर उसाची वाहने अडवण्यात आली. यामुळे रस्त्यावर तीन किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. कृष्णा साबळे, कृषिभूषण भाऊसाहेब थोरात, चंद्रकांत देशमुख, मेने आप्पा, दिनकर पवार, प्रकाश बोरसे, रामेश्वर भुसारे, सुनील बोडखे, आकाश बोलधने, विजय हारदे, शिवाजी बचाटे आदींसह शेतकरी आंदोलनात सहभागी आहेत. जोपर्यंत भाव देत नाही तोपर्यंत वाहतूकही नाही उसाला प्रतिटन ५ हजार भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी असून उसाला योग्य भाव नाही, तर रस्त्यावरून वाहतूकही होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह ऊस उत्पादकांनी शहागड फाटा चौकात वाहतूक रोखून धरली आहे. मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणे गरजेचे सध्या शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकारने त्यांना तात्काळ दिलासा दिला पाहिजे. उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव दिला तरच आम्ही हे आंदोलन मागे घेणार आहोत, अन्यथा आंदोलन असेच सुरू राहील आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला सरकारच पूर्णपणे जबाबदार असेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली मुळे म्हणाले.
Source link
पैठणमध्ये ऊसदर आंदोलन सुरूच:शहागड फाट्यावर 550 वाहने ठप्प, कन्नड तालुक्यातही आंदोलनास सुरुवात