![]()
यंदा पावसाळ्यात सोयगाव परिसरात केवळ एकदाच दमदार पाऊस झाल्याने विहिरींमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा झाला होता. मात्र, पावसातील मोठी तूट आणि सुरुवातीपासूनच पिकांना द्यावे लागणारे संरक्षित पाणी, यामुळे ऐन ऑक्टोबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. खरीप हंगामातील पिकांची झालेली धूळधाण आणि परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. आधीच अस्मानी संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता गंभीर चारा आणि पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. यंदाच्या खरिपात पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने कपाशी, मका यांसारख्या मुख्य पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. पिकांसाठी केलेला भांडवली खर्च निघणेही कठीण झाले असून, ऑक्टोबरच्या तीव्र उन्हामुळे उभी पिके डोळ्यांदेखत वाळू लागली आहेत. परतीच्या पावसावर रब्बीची मदार होती; परंतु त्यानेही दांडी मारल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी, आगामी रब्बी हंगामात पिकांना पाणी कुठून आणायचे, असा यक्षप्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे. शेतीतील उत्पन्न घटल्याने ग्रामीण भागाचे अर्थकारण पार कोलमडले आहे. सध्या पीक कापणीसाठी एकरी ५०० ते ६०० रुपये, तर कपाशी वेचणीसाठी ३०० ते ३५० रुपये मजुरीचा दर आहे. मजुरीचे दर स्थिर असले तरी पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतीचा खर्च भागवणे शेतकऱ्यांना अशक्य जात आहे. खालावलेल्या भूजल पातळीचा परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर सोयगाव तालुक्यात दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारी, दादर, मका आणि बाजरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, जमिनीतील खालावलेली भूजल पातळी आणि विहिरींमधील ठणठणाट यामुळे रब्बीच्या पेरण्यांवर थेट दुष्काळाचे सावट पसरले आहे. रब्बीचे क्षेत्र घटल्यास आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर रूप धारण करणार आहे. पशुपालकांना चाऱ्यासाठी वणवण भटकावे लागण्याची चिन्हे असून, उन्हाळ्यात परिस्थिती अधिक भयावह होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Source link
ऑक्टोबरमध्येच विहिरींनी गाठला तळ; रब्बीच्या आशा मावळल्या:सोयगाव तालुक्यात चारा आणि पाणीटंचाईचे संकट गडद