Headlines

हजारो भाविकांनी घेतले श्री इंद्रगढी देवीचे दर्शन:सातव्या माळेमुळे भाविकांची गर्दी वाढली‎




घाटनांद्रा घाटनांद्राजवळ डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री इंद्रगढी देवीच्या नवरात्र उत्सवात शनिवारी सातव्या माळेला हजारो भाविकांनी दर्शनासाठी गडावर मोठी गर्दी केली. “जय मातादी’च्या जयघोषाने संपूर्ण डोंगर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत या दुष्काळापासून सर्वांची मुक्तता कर, असे साकडे घातले. ब्रह्मलीन जबलपूरकर स्वामी यांच्या आशीर्वादाने आणि संस्थान विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. गडावर रोज देवीची पूजा, प्रात:कालीन आरती, सप्तशतीचे पठण होत असून अष्टमीला होम-हवन आणि नवव्या दिवशी नवीन वस्त्रालंकार अर्पण केले जाणार आहेत. इंद्रदेव या ठिकाणी शापमुक्त झाल्याने या शक्तिपीठाला ‘इंद्रगढी’ नाव पडले. तसेच हे पीठ माहूरच्या रेणुकामातेचे उपपीठ मानले जाते. खानदेश व मराठवाड्यातून वर्षभर भाविक येथे येतात. नवरात्रोत्सवात मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले असून बेल-फुलांची दुकाने थाटण्यात आली आहेत. दहा दिवसांच्या या उत्सवाची सांगता सीमोल्लंघनाने होईल. विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याचे संस्थानचे अध्यक्ष रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, संस्थापक अध्यक्ष सुरेश गुळवे, समाधान सोनवणे, रामजी मोरे, रामराव सुलताने, दगडूलाल खत्ती, त्रिंबक सोनवणे, नंदकिशोर शर्मा, नामदेव पवार, पांडुरंग मोरे, रत्नाकर भरकर, भिकन मोरे आणि लक्ष्मण जाधव यांनी सांगितले. घाटनांद्रा येथे सातव्या माळेला हजारो भाविकांनी दर्शन घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *