Headlines

अंदाजपत्रकाला मंजुरी:सटाण्यातील महामार्गाचे‎डांबरीकरण दिवाळीनंतर‎, नगराध्यक्षा पाटील यांची माहिती‎




शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-जीच्या रखडलेल्या कामामुळे धूळ, खड्डे आणि अपघातांच्या धोक्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या संपूर्ण डांबरीकरणाचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून, निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी दिली. महामार्ग विभागाने पूर्वीचे काम रद्द केल्यानंतर रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या प्रश्नावर नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला. २८ जानेवारी २०२६ रोजी नगरपरिषद सभागृहात बैठक झाली. त्यानंतर १७ एप्रिल रोजी राधाई मंगल कार्यालयात बैठक झाली. दुसऱ्या दिवशी नगरपरिषदेत झालेल्या बैठकीत नगरसेवक, नागरिक आणि पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. तोडगा न निघाल्याने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. २० ऑगस्ट २०२६ रोजी मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक झाली. मुंबईतील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, प्रांताधिकारी महेश शेलार आणि मुख्याधिकारी ज्योती भगत यांच्यासह संबंधित अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत संपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. डांबरीकरणामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. भविष्यातील रस्ते प्रकल्पामुळे भुयारी गटार आणि पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे प्रश्नही कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी व्यक्त केला. आयआरसी मानांकनानुसार काँक्रीट रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. यात भूमिगत जलवाहिन्या, मलजल वाहिन्या, पावसाच्या पाण्याचा निचरा, विद्युत व दूरसंचार वाहिन्या, पदपथ आणि युटिलिटी स्पेसचा समावेश असेल. नवीन प्रकल्पाला मंजुरी मिळेपर्यंत नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रथम डांबरीकरण केले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *