Headlines

पार्थ पवार यांच्या वागणुकीबाबत थेट शरद पवार यांच्याकडे नाराजी:राष्ट्रवादीत असंतोषाची ठिणगी; दादा गेल्यानंतर पक्षात बदलले समीकरण




अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि संघर्ष उघडपणे समोर येऊ लागला आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटनेत मोठे बदल करण्यात आले. मात्र, नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमुळे पक्षातील अनेक वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेषतः प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांसारख्या अनुभवी नेत्यांना प्रमुख पदांपासून दूर ठेवण्यात आल्याने पक्षात अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. हा संपूर्ण वाद आता थेट शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या नव्या यादीत सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र, खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनाही महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, इतर राज्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांसमोर स्पष्ट पदनाम नमूद करण्यात आले असताना तटकरे यांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतील एका वरिष्ठ नेत्याने पार्थ पवार यांच्या वागणुकीबाबत थेट शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. आम्हीही पक्षासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली आहे. दादा असताना अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती, असे सांगत संबंधित नेत्याने आपला मान-सन्मान राखला जावा, अशी भावना व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. पार्थ पवारांना समज द्यावी, अशी मागणीही शरद पवारांकडे करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, हा नेता नेमका कोण, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घडामोडींमध्ये सुनील तटकरे यांच्या अलीकडील सिल्व्हर ओक भेटीचीही जोरदार चर्चा आहे. अनेक वर्षांनंतर तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. तटकरे यांनी ही भेट केवळ शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे सांगितले असले, तरी राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवरही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाने पुण्यानंतर मुंबईतही बैठक बोलावल्याने दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये पडद्यामागे हालचाली वाढल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याबाबतही चर्चांना वेग आला आहे. रोहित पवार यांनी याबाबत बोलताना, एकत्र यायचे असेल तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपविरोधी भूमिका घ्यावी लागेल, असे स्पष्ट मत मांडले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व, संघटनात्मक बदल आणि संभाव्य विलीनीकरण या मुद्द्यांवर आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *