![]()
नीट पेपर फुटीप्रकरणी पुण्यातील मॉडर्न कॉलेजात २४ वर्षांपासून इयत्ता ११, १२ वीला बॉटनी विषय शिकवणाऱ्या आणि नीट परीक्षेच्या पेपर सेटर प्रा. मनीषा गुरुनाथ मांढरेला दिल्लीतून अटक करण्यात आली. लातूरचे केमिस्ट्रीचे पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, पुण्यातील ब्यूटिशियन व्यावसायिक मनीषा वाघमारे यांच्याशी हातमिळवणी करून तिने बॉटनी (वनस्पतीशास्त्र), झुऑलॉजी (प्राणिशास्त्र) विषयाचे प्रश्न फोडून काही विद्यार्थ्यांना दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. कुलकर्णी, वाघमारेला १० दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रा. मांढरे ६ महिन्यांनी निवृत्त होणार होत्या. सीबीआयच्या पथकाने शनिवारी मांढरेंच्या घरी कागदपत्रांची तपासणी तसेच त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरात ६ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात एकूण ९ जणांना अटक झाली असून त्यातील ५ जण महाराष्ट्रातील आहेत. पुण्यातून याआधी धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारेला अटक झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने एनटीए म्हणजे परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेच्या संचालकपदी भारतीय सांख्यिकी सेवेतील १९९८-बॅचच्या अधिकारी अनुजा बापट, भारतीय महसूल सेवेच्या २००४-बॅचच्या अधिकारी रुचिता विज यांची पाच वर्षांसाठी सहसचिवपदी, भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आकाश जैन, भारतीय लेखापरीक्षण अधिकारी आदित्य राजेंद्र भोजगढिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती केली. वाघमारे-मांढरे एकाच सोसायटीत रहिवासी सूत्रांनी सांगितले की, पेपर सेटर असल्याने मांढरेला बॉटनी, झुऑलॉजीच्या प्रश्नपत्रिकांची पूर्ण माहिती, अॅक्सेस मिळाला होता. त्याचा त्यांनी फायदा घेतला. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मनीषा वाघमारे आणि मांढरे पुण्यात एकाच सोसायटीत राहतात. लातूर येथून अटक केलेले प्रा. प्रल्हाद कुलकर्णींसोबत त्यांनी प्रश्नपत्रिका फोडण्याचे कारस्थान केले. ६ वर्षांपासून पेपर सेटर होत्या मांढरे मांढरे सहा वर्षांपासून एनटीएमध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम करत होत्या. त्यांनी बॉटनी, झुऑलॉजीचे प्रश्न काही विद्यार्थ्यांना घरी शिकवणीसाठी बोलावून दिले, अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे. मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सांगितले की, एनटीएकडून मांढेरेंना प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी ईमेलवर माहिती येत होती. त्या सुट्टी घेऊन कुठे प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी जात होत्या याची कल्पना नाही. त्यांचे काम गोपनीय असल्याने त्याबाबत कोणती विचारणादेखील आम्ही करू शकत नव्हतो. आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. सीबीआयच्या तपासात समोर आले की, एप्रिल अखेरीस मांढरेने पुण्यातील ब्यूटिशियन मनीषा वाघमारेच्या मदतीने काही विद्यार्थ्यांसाठी स्वत:च्या घरी विशेष कोचिंग क्लासेस घेतले. त्यात काही प्रश्न लिहून पाठ्यपुस्तकात खुणाही करून दिल्या. ३ मे रोजी झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेतील बहुतांश प्रश्न मांढरेने दिलेल्या प्रश्नांशी तंतोतंत जुळले. सीबीआय पथकाने मनीषा वाघमारे पती संजय वाघमारे यांच्या बिबवेवाडीतील डेन्टल क्लिनिकवर छापा टाकला. तेथून सीसीटीव्ही फुटेज जप्त केले.
Source link
नीट प्रकरण:पुण्यात तिसरी कारवाई, बॉटनीच्या प्राध्यापिकेला अटक, मॉडर्न कॉलेजमध्ये 24 वर्षांपासून कार्यरत मनीषा मांढरे पेपरफुटीत सूत्रधार