![]()
मोसम खोऱ्यासह संपूर्ण बागलाण तालुक्यात यंदा उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, भूजल पातळी खालावल्याने अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीचे तिसरे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी मोसम खोऱ्यातील नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, हे आवर्तन सोडण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, पुढील आठवड्यात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे. ११६६ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या हरणबारी धरणावर बागलाण आणि मालेगाव तालुक्यातील सुमारे दीडशे गावे अवलंबून आहेत. नियमानुसार या धरणातून वर्षाला तीन आवर्तने दिली जातात; त्यापैकी दोन आवर्तने शेती सिंचनासाठी दिली गेली असून, मे महिन्यातील पिण्याच्या पाण्याचे एक आवर्तन सध्या शिल्लक आहे. सध्या धरणात ६६३ दलघफू इतका जलसाठा उपलब्ध आहे, जो मागील वर्षी याच काळात ४६६ दलघफू इतका होता. हे आवर्तन सुटल्यास मोसम खोऱ्यातील सुमारे ४५ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या विहिरींनी तळ गाठल्यामुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. केवळ नागरिकांच्याच नव्हे, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जायखेडा गावासह परिसरातील शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी मोसम नदीकाठावर आहेत. नदी कोरडी पडल्याने आणि विहिरींनी तळ गाठल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. हरणबारीतून आवर्तन सुटल्यास पाळीव जनावरे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. – संजय मोरे, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत जायखेडा
Source link
टंचाई:मोसम खोऱ्यात 45 हून अधिकगावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर, हरणबारी धरणातून तिसरे आवर्तन सोडण्याची नागरिकांची मागणी