![]()
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे एका महिला अधिपरिचारिकेवर (नर्स) झालेल्या अत्याचाराची स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनादरम्यान या परिचारिकांनी आज दिवसभरात पालकमंत्री, जीएमसीचे अधिष्ठाता, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आणि सिटी कोतवालीचे ठाणेदार यांची स्वतंत्ररित्या भेट घेऊन कारवाईबाबत त्यांना साकडे घातले. आंदोलन सुरु करण्यामागे पोलिस प्रशासनाच्या उदासीन भूमिकेची किनार आहे. या उदासिनतेविरोधातच संघटनेने आज, १६ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले. तत्पूर्वी १५ मे रोजी परिचारिकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांच्या निवेदनानुसार येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारिकेवर गेल्या ६ मे रोजी कर्तव्यावर असताना एका अनाहूत नागरिकाने तिचा विनयभंग करुन लुटालुटीचा प्रकार केला. या घटनेची तक्रार पीडित परिचारिकेने दुसऱ्याच दिवशी ७ मे रोजी येथील सिटी कोतवाली ठाण्यात नोंदवली. परंतु आरोपीची ओळख पटली असतानाही पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यानच्या काळात पिडीत परिचारिकेने आरोग्य प्रशासनासोबतच त्यांच्या संघटनेकडेही दाद मागितली. त्यानंतर हा विषय संघटितरित्या पुढे आला आणि आता आंदोलन सुरु आहे. परंतु पोलिसांनी मात्र अद्याप हव्या त्या तत्परतेने कारवाई केली नाही, असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. तक्रार दाखल होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन आरोपीला जेरबंद का केले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या बॅनरखाली हा लढा सुरु आहे. पोलिसांसोबतच आंदोलनकर्त्यांनी आरोग्य प्रशासनाकडेही कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. जीएमसीच्या अधिष्ठाता यांना दिलेल्या लेखी निवेदनात त्यांनी तसा स्पष्ट इशारा दिला आहे. आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होऊन रुग्णसेवा खंडित झाल्यास त्याची संपूर्ण आणि सर्वस्वी जबाबदारी केवळ आणि केवळ स्थानिक प्रशासनाची राहील, असे या पत्रात म्हटले आहे. आता या संवेदनशील प्रकरणात रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासन काय पावले उचलते आणि आंदोलन कधी मागे घेतले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर परिचारिकेच्या मुद्द्यासह इतर प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी इर्विन, डफरीन आणि सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलमधील परिचारिकांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशनने ही हाक दिली असून तसे पत्र गेल्या ११ मे रोजीच आरोग्य उपसंचालकांना पाठविले आहे. १७ मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १८ मे रोजी काम बंद आंदोलन केले जाईल, असे या पत्रात म्हटले आहे. युनियनच्या अध्यक्ष वर्षा पागोटे व इतर पदाधिकाऱ्यांच्या त्यावर स्वाक्षरी आहेत. इर्विन, डफरीनच्या परिचारिकांचे १८ ला काम बंद
Source link
परिचारिकांचे कामबंद आंदोलन:सेवा विस्कळीत होण्याची भीती, शल्य चिकित्सक, पालकमंत्र्यांची घेतली भेट