![]()
खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या बोरगाव मंजूसह ग्रामीण भागात पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत डिझेल आणि इंधनाच्या दरात झालेली सातत्यपूर्ण वाढ झाल्याने ट्रॅक्टरचे भाडे २० टक्के वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेती कसण्याचा खर्च आता शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून, ऐन हंगामात इंधन दरवाढीचा मोठा फटका मशागतीच्या कामांना बसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बैलगाडी किंवा बैलांच्या साहाय्याने केली जाणारी वखरणी, नांगरणी किंवा पेरणी काळाच्या ओघात जवळपास कालबाह्य झाली आहे. बैलजोडीची जागा आता पूर्णपणे ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांनी घेतली आहे. शेतीची मशागत, पेरणी, फवारणी, कापणी आणि पिके बाजारात नेण्यापर्यंतच्या सर्वच कामांसाठी शेतकरी पूर्णपणे ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. मात्र, डिझेलच्या किमती वाढल्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे प्रति एकर दर वाढवले आहेत. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आता या दरवाढीमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. विहिरीला पाणी असूनही डिझेल पंपांचा खर्च परवडत नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवेळी पाऊस किंवा अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात घट होणे हे गत दोन दशकांपासूनचे वास्तव आहे. त्यातच या नव्या दरवाढीमुळे लागलेला खर्चही हाती पडेल की नाही, अशी भीती बोरगाव मंजू परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत. बैलांची संख्या घटल्याने शेतकरी हतबल : पूर्वी एकाच शेतकऱ्याच्या दावणीला खंडीभर गुरे असायची. शेणखताच्या वापरामुळे रासायनिक खतांचा खर्च वाचायचा आणि घरचेच बियाणे वापरल्याने शेती किफायतशीर ठरायची. परंतु, चारा टंचाई आणि देखभालीचा खर्च परवडत नसल्याने गेल्या काही वर्षांत बैलांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. आज सर्वसामान्य शेतकऱ्याला नवीन बैलजोडी खरेदी करणे अशक्य झाल्याने, नाइलाजास्तव डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचाच पर्याय निवडावा लागत आहे. शेतकऱ्यांना डिझेलवर अनुदान देण्यात यावे ^हवामानात बदल झाल्याने कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होते. बाजारात मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यात आता डिझेल महाग झाल्याने ट्रॅक्टरचे भाडे देणे कठीण झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या डिझेलवर विशेष अनुदान दिली पाहिजे, अन्यथा शेती करणे बंद करावे लागेल. – मनोहर वानखडे, शेतकरी, बोरगाव मंजू.
Source link
मशागतीच्या ऐन हंगामात डिझेलची ‘आग':ट्रॅक्टरचे भाडे 20% वधारले, पारंपरिक शेती कालबाह्य; यांत्रिकीकरणावर भर