Headlines

कोकणातील शेतकऱ्यांना दिली बोगस खते, कीटकनाशके:कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मागणी




माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे कृषी आयुक्तांची भेट घेऊन बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे या निकृष्ट उत्पादनांमुळे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी अशा दुहेरी संकटात सापडले आहेत. औषध कंपन्यांच्या दरांवर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची औषधे खरेदी केली आहेत. औषध कंपन्यांकडून खते, कीटकनाशके, पीजीआर (PGR) आणि बुरशीनाशकांचा वापर कोणत्या पद्धतीने करावा, याबाबत योग्य माहिती न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आंबा पिकासाठी जवळपास ७० हून अधिक कंपन्यांनी औषधांची विक्री केली आहे. या कंपन्यांच्या औषधांच्या किमतीत मोठी तफावत असून, शेतकरी रोखीने औषध खरेदी केल्यास मूळ किमतीच्या ६० ते ६५ टक्के सवलत दिली जाते. गुण नियंत्रण विभागाकडून मोजक्याच कंपन्यांच्या औषधांची तपासणी करण्यात येते, यामुळे बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी बोलताना माजी आमदार बाळा माने यांनी, आंबा पिकांच्या कीड रोगांच्या औषध फवारणीमध्ये संशोधन विभागाने नेमके काय संशोधन केले, तसेच ज्या औषध कंपन्या बोगस आहेत, त्यांच्यावर गुणनियंत्रण विभागाने काय कारवाई केली, असे प्रश्न उपस्थित केले. १९९० सालापासून गुणनियंत्रण विभाग व कृषी विद्यापीठाकडून फळबाग लागवडीसाठी नाविन्यपूर्ण कोणतेच संशोधन करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या बैठकीला संचालक गुण नियंत्रक सुनील बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, गणेश गायकर, सुशांत नाईक, प्रशांत शिंदे, प्रकाश बालवडकर, अजय तेली, उमेश वाळके, तिमीर माणगांवकर, सुजीत चौकेकर, दीपक कदम, विनय पाडावे, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *