![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने विधान परिषदेच्या परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विल्पव बाजोरिया यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबंधी आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी बाजोरिया यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागलेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेने परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विल्पव बाजोरिया यांचे नाव फायनल केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विल्पव यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विल्पव बाजोरिया यांनी महायुतीमधील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. मुलगा परभणी हिंगोली, वडील अमरावतीसाठी आग्रही विल्पव यांनी कालच आपले वडील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. विल्पव हे मूळचे अकोल्याचे आहेत. त्यांनी यापूर्वीही परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे विल्पव यांचे वडील गोपीकिशन बाजोरिया यांनी स्वतःसाठी भाजपच्या ताब्यात असलेल्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा केला आहे. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. अमरावती मतदारसंघातील काँग्रेस नगरसेवकांचाही आपल्याला मोठा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा त्यांनी या प्रकरणी केला आहे. गोपीकिशन बाजोरिया यांनी यापूर्वी अकोला – वाशिम – बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे सलत 3 वेळा प्रतिनिधित्व केले होते. भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी 2022 च्या निवडणुकीत गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव केला होता. त्यावेळी बाजोरिया पितापुत्र एकाचवेळी विधान परिषदेत होते. पुण्याच्या जागेसाठी भाजप – राष्ट्रवादीत रस्सीखेच दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीत पुण्याच्या जागेवरून भाजप – राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पुणे विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसेल निवडून आले होते. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीतर्फे पुणे जिल्ह्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा असल्याचा दाखलाही दिला जात आहे. विशेषतः यावेळी पिंपरी चिंचवड येथील एखाद्या पदाधिकाऱ्याला आमदारकीची संधी द्यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली जात आहे. राष्ट्रवादीतर्फे या ठिकाणी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे व भाऊसाहेब भोईर हे इच्छुक आहेत. यापैकी कोणत्याही एका नेत्याला संधी दिली जावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीची 348, तर भाजपची 319 मते आहेत. शिंदे गटाच्या 68 मतांची यात भर पडणास असल्यामुळे दगाफटका न झाल्यास येथून महायुतीचा उमेदवार निवडून येणे सहज शक्य आहे. यामुळेच या जागेसाठी राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांनी चांगलाच जोर लावला आहे.
Source link