Headlines

स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग बंद होणार:मेट्रो प्रकल्पामुळे पुण्यातील अखेरच्या बीआरटीला पूर्णविराम, 2006 मध्ये झाला होता सुरू




पुण्यातील स्वारगेट ते कात्रज हा सुमारे सहा किलोमीटरचा बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्ग आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पामुळे या मार्गावरही पूर्णविराम लागण्याची चिन्हे आहेत. २००६ मध्ये मोठ्या अपेक्षेने सुरू झालेला देशातील पहिला बीआरटी प्रयोग दोन दशकांनंतर टप्प्याटप्प्याने इतिहासजमा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सार्वजनिक बस वाहतूक जलद, सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने कोलंबियातील बोगोटा शहराच्या धर्तीवर पुण्यात बीआरटी प्रकल्प राबविण्यात आला होता. मोठ्या रस्त्यांच्या मध्यभागातून बससाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली होती. सातारा रस्त्यावर स्वारगेट ते कात्रज हा पहिला बीआरटी मार्ग विकसित करून त्याचे उद्घाटन झाले होते. बीआरटी अंतर्गत मध्यभागी बसस्थानके, दोन्ही बाजूंनी उघडणाऱ्या दरवाजांसह विशेष बससेवा आणि आधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली होती. या प्रकल्पानंतर पीएमटी आणि पीसीएमटी यांचे विलीनीकरण करून पीएमपीएमएलची स्थापना करण्यात आली. त्यावेळी हा प्रकल्प पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा बदल मानला जात होता. यानंतर शहरातील सोलापूर रोड, नगर रोड, संगमवाडी-विश्रांतवाडी तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातही बीआरटी मार्ग उभारण्यात आले. मात्र, सुरुवातीपासूनच या प्रकल्पावर टीका होत राहिली. बीआरटी मार्गात इतर वाहनांची घुसखोरी, वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि तांत्रिक बिघाड यामुळे या प्रकल्पाची कार्यक्षमता कमी होत गेली. या समस्यांमुळे हडपसर रोड, संगमवाडी परिसर आणि नगर रोडवरील अनेक बीआरटी मार्ग टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले. काही ठिकाणी मार्ग अस्तित्वात असला, तरी बीआरटी सेवा बंद करून तो सर्वसाधारण वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर स्वारगेट ते कात्रज हा शहरातील सर्वात जुना आणि शेवटपर्यंत सुरू असलेला बीआरटी मार्ग ठरला होता. मात्र, स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे या मार्गावरही परिणाम झाला आहे. अरण्येश्वर ते पद्मावती दरम्यानचा भाग आधीच हटविण्यात आला असून, इतर काही भागांवर उड्डाणपूल व मेट्रो कामामुळे निर्बंध आले आहेत. सध्या काही ठिकाणी बीआरटी सेवा सुरू असली, तरी मेट्रोचे काम पुढे सरकताच उर्वरित मार्गही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील बीआरटी प्रकल्पाचा शेवट आता केवळ औपचारिकतेपुरता उरल्याची चर्चा वाहतूक क्षेत्रात सुरू झाली आहे. कधीकाळी आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचे प्रतीक मानला गेलेला बीआरटी प्रकल्प आता इतिहासाच्या पानांमध्ये जमा होण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *