![]()
अधिक मासात भगवंताचे नामस्मरण केल्यास अनंतपटीने पुण्य लाभते. या पवित्र काळात केलेले एक कीर्तन हजार कीर्तनांचे पुण्य देऊन जाते, असे प्रतिपादन केशव महाराज मुळीक यांनी केले. उमराणे येथे समस्त ग्रामस्थ आणि रामेश्वर भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात त्यांनी कीर्तनातून मार्गदर्शन केले. अखंड हरिनाम सप्ताहामुळे सध्या उमराणे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. या सोहळ्यात केशव महाराज मुळीक यांच्या रसाळ आणि सुश्राव्य कीर्तनाने उपस्थित हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले. सप्ताह यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण मंडळी आणि स्वयंसेवक रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. सप्ताहानिमित्त सकाळी आयोजित करण्यात आलेल्या बिल्व अर्चना पूजेसाठी भाविक भगिनींनी मोठी गर्दी केली होती. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक भाविकांनी फुलून गेला होता. पूजेसाठी लागणारा बेल जाणता राजा मित्र मंडळा यांच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात आला. कीर्तनात परमार्थातील ‘मंगल’ शब्दाचे महत्त्व विशद करताना केशव महाराज मुळीक यांनी नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक अशा तीन प्रकारच्या मंगलाचरणांची माहिती दिली. भगवान परमात्मा स्वतः मंगल असून त्यांचे नाम आणि धामही परम मंगल असल्याचे त्यांनी सांगितले. मानवी जीवनातील कर्मांचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी कर्मांचे निशिद्ध कर्म आणि विहित कर्म असे दोन प्रमुख प्रकार सांगितले. शास्त्राने वर्ज्य केलेली कर्मे कधीही करू नयेत, असे नमूद करत विहित कर्मांचे काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म असे चार प्रकार त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. लाख मोलाचा मनुष्य जन्म मिळूनही भगवंताचे नामस्मरण केले नाही तर जीवन व्यर्थ ठरते. केवळ वरवर नाम न घेता शुद्ध मन आणि पवित्र अंतःकरणाने केलेली भगवंताची आळवणीच परमात्म्याला प्रसन्न करते, असेही त्यांनी सांगितले.या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी १० ते १२ या वेळेत अनंत महाराज वहाडणे यांच्या संगीतमय मधुर आवाजात श्रीरामकथा प्रवचन होत असून भाविक त्याचा लाभ घेत आहेत. व्यासपीठाचे नेतृत्व विश्वनाथ महाराज कोल्हे करत आहेत. या धार्मिक महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामेश्वर भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवार (दि. २३) संदिपान महाराज शिंदे यांचे कीर्तन होणार आहे. जाणता राजा मित्रमंडळातर्फे बेलसेवेची अखंड परंपरा अखंड हरिनाम सप्ताहातील बिल्व अर्चना पूजेसाठी लागणारा बेल जाणता राजा मित्र मंडळ यांच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्या सलग ३० वर्षांपासून मंडळाकडून ही सेवा अखंडपणे सुरू असून, धार्मिक कार्यातील या सातत्यपूर्ण योगदानाचे भाविकांकडून कौतूक व्यक्त करण्यात येत आहे.
Source link
अधिक मासात भगवंताचे नामस्मरण केल्यामुळे लाभते अनंतपटीने पुण्य:उमराणे येथे कीर्तनकार केशव महाराज मुळीक यांचा उपदेश