Headlines

महात्मा फुले चित्ररथाचे नेरपिंगळाईत भव्य स्वागत:अखिल भारतीय समता परिषदेचा समाजप्रबोधनाचा उपक्रम




नेरपिंगळाई येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विशेष चित्ररथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामस्थांनी या चित्ररथाचे उत्साहात स्वागत केले. हा विशेष चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरून समाजप्रबोधनाचे कार्य करणार आहे. चित्ररथात महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा हे विशेष आकर्षण आहे. यासोबतच सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळेही आहेत. महात्मा फुले यांनी लिहिलेली पुस्तके आणि पेन यांसारख्या ज्ञानाच्या प्रतीकांचे प्रभावी प्रदर्शन यात करण्यात आले आहे. पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा आणि भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची प्रतिकृतीही या चित्ररथात साकारण्यात आली आहे. समता, बंधुता, न्याय आणि शिक्षणाचा संदेश देणारा हा चित्ररथ नेरपिंगळाई येथील बाजार चौकात दाखल होताच ढोल पथकाच्या गजरात, फटाके फोडून व फुलांची उधळण करून त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर लेकुरवाळे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली गजानन नवले यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर गणेश चौक व इंदिरा चौक येथेही चित्ररथाचे उत्स्फूर्त स्वागत झाले, जिथे संजय मंगळे व विलास खाजबागे यांनी माल्यार्पण केले. यावेळी विनायक खाडे, मंगला मंगळे, पल्लवी भोजने, चेतना मंगळे, नरेंद्र फसाटे, राहुल मंगळे, विजया फसाटे, शिल्पा भोजने, पदमा फसाटे, पुण्यवर्धन राऊत, अंबादास राऊत, राजेश राऊत, संजय राऊत, विलास काकपुरे, सचिन कोकाटे, कल्पना पाखोडे, शिला उपरीकर, संगीता आमले, सागर बाणेवार, कांचन बोपले, कैलास कनेर, प्रदीप तायवाडे, आदर्श नवले, प्रदीप डोळस, केशव नंदरधने, गोपाल राऊत, देवराव बनकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हा चित्ररथ उपक्रम समाजात समतेची जाणीव अधिक दृढ करून नवचैतन्य निर्माण करणारा ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *