![]()
अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. पोलिस कर्मचाऱ्यांना हँडग्रेनेड हाताळण्याचे प्रात्यक्षिक दिले जात असताना अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या भीषण अपघातात चार प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याने संपूर्ण पोलिस मुख्यालयात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर नियमित प्रशिक्षण सुरू होते. यावेळी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना स्मोक हँडग्रेनेड कसे वापरायचे आणि त्याची हाताळणी कशी करायची, याबाबत मार्गदर्शन केले जात होते. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सुरू असतानाच अचानक संबंधित ग्रेनेडचा हातातच स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित कर्मचारी आणि अधिकारीही काही काळ गोंधळून गेले. या दुर्घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील दोन जणांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्याची माहिती समोर आली आहे. इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली असली तरी स्फोटाच्या तीव्रतेमुळे सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसला आहे. घटनेनंतर जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे पोलिस दलात चिंता व्यक्त केली जात असून प्रशिक्षण प्रक्रियेतील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. घटनास्थळी तपासासाठी विशेष पथकही दाखल झाले आहे. ग्रेनेडची पीन काढल्यानंतर लिव्हर सुटल्याने अपघाती स्फोट दरम्यान, राखीव पोलिस निरीक्षक उमेश परदेशी यांनी या घटनेबाबत प्राथमिक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जमाव नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या स्मोक हँडग्रेनेडचे प्रशिक्षण सुरू होते. संबंधित जवानाने ग्रेनेडची पीन काढल्यानंतर लिव्हर हातातून सुटल्याने हा अपघाती स्फोट झाला. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा प्रक्रियेत आणखी कडक उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Source link
अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात भीषण स्फोट; ट्रेनिंगदरम्यान हँडग्रेनेड फुटून चार जखमी:2 कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या