![]()
आगामी बकरी ईदच्या (ईद ऊल जुआ) अनुषंगाने अकोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, यासाठी अकोला पोलिसांच्या वतीने बुधवारी (दि. २७) शहरात पथसंचलन करण्यात आले. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर विभाग) सुदर्शन पाटील यांच्या नेतृत्वात सायंकाळी ४:३० वाजता हा रूट मार्च काढण्यात आला. अकोला शहर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, गुन्हेगारांवर वचक बसावा व आगामी सण-उत्सव निर्भय व शांततेत पार पडावेत, या प्रमुख उद्देशाने या मार्चचे आयोजन करण्यात आले. शहरातील विविध भागांतून काढण्यात आला मार्च हा रूट मार्च प्रामुख्याने जुने शहर पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून काढण्यात आला. चाँद खॉ प्लॉट हरिहर पेठ येथून सुरू झालेला हा मार्च किल्ला चौक, लकड गंज, माळी पुरा चौक, अकोट स्टँड, सुभाष चौक, तेली पुरा चौक, ताजनापेठ, सराफा चौक, गांधी चौक मार्गे कोतवाली चौक असा मार्गक्रमण करत संपन्न झाला. सण शांततेत पार पाडा आगामी सण-उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी अकोला पोलिस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शहरात कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिस मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Source link
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केले पथसंचलन