Headlines

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:ठाकरे गटाकडून बबनराव थोरातांसह डॉ. विवेक नावंदर इच्छुक, मतदारसंख्या कमी असूनही उबाठा मैदानात




परभणी –हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मुंबई येथे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे असल्याचे सुत्रांनी सांगितले. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये थेट लढत होणार आहे. त्यातच महायुतीकडे मतदारांची संख्या अधिक असल्याने महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे मतदारांची संख्या कमी आहे तर ही जागा पूर्वी शिवसेनेकडे होती त्यामुळे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाने या जागेवर दावा केला आहे. अपेक्षेनुसार ठाकरे गटाकडे ही जागा सोडण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून जागा ठाकरे गटाकडे येणार असल्याचे लक्षात येताच मुंबई येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह मिलींद नार्वेकर, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती होती. याशिवाय हिंगोलीचे ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख, परभणीचे जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेसाठी बबनराव थोरात यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. या शिवाय परभणी येथील डॉ. विवेक नावंदर देखील निवडणुक लढविण्यास इच्छूक असून त्यांनीही उमेदवारी मागितल्याचे सुत्रांनी सांगितले. परभणी-हिंगोली विधान परिषदेत बहुमत नसतांनाही महायुतीच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा उचलण्याची तयारी ठाकरे गटाने चालविल्याचे चित्र आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *