Headlines

नवकार आर्ट फाऊंडेशनचे कला प्रदर्शन सुरू:पुणे सकल जैन संघाचे अध्यक्ष विलास राठोड यांच्या हस्ते झाले उद्घाटन




नवकार आर्ट फाऊंडेशन आयोजित कला प्रदर्शनाला बालगंधर्व कलादालनात सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील ६५ युवा आणि ज्येष्ठ चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. पुणे सकल जैन संघाचे अध्यक्ष विलास राठोड यांनी उद्‌घाटनप्रसंगी बोलताना, कला हे समाजाला जोडण्याचे आणि परिवर्तनाचे माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. गेल्या ११ वर्षांपासून नवकार आर्ट फाऊंडेशन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांना त्यांची कलाकृती रसिकांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. फाऊंडेशनच्या या उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातून ६५ चित्रकारांनी सहभाग नोंदवला आहे, ज्यात २० बालकलाकार आणि ३५ महिला कलाकारांचा समावेश आहे. सात वर्षांपासून ते ७० वर्षांपर्यंतच्या कलाकारांनी आपल्या आकर्षक कलाकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. मुख्य संयोजक मनसुख छाजेड आणि प्रेरणा नहार यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, मार्चपासून निवड प्रक्रिया सुरू झाली होती. या प्रक्रियेत ९० प्रवेशिकांमधून प्रमाणबद्धता, रंगसंगती आणि तंत्राच्या आधारे १२५ उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली. यावेळी सुरेश लोणकर, संदीप भंडारी, नगरसेविका सपना छाजेड, मनीषा चोरबेले, सूर्यदत्ता ग्रुपचे प्रमुख संजय चोरडिया, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, मल्लिकार्जुन सिद्धगी, यश कलवणकर, मुकीम तांबोळी, शंकर गोर्जे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी प्रदर्शनातील कलाकृतींची पाहणी करून कलाकारांशी त्यांच्या संकल्पना, मांडणी आणि विविध तंत्रांविषयी संवाद साधला. सुरेश लोणकर यांनी कार्यक्रमाचे आणि कलाकारांनी रेखाटलेल्या कलाकृतींच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. संदीप भंडारी यांनी कलेचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल फाऊंडेशनचे आभार मानले. नगरसेविका सपना छाजेड यांनी चित्रांमधील तंत्रांचे कौतुक करत या उपक्रमाचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मनिषा चोरबेले म्हणाल्या की, जैन समाजाकडे केवळ व्यापारी म्हणून बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन या उपक्रमामुळे निश्चित बदलेल. युवा तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन म्हणजे परिवर्तनाची प्रक्रिया असल्याचे संजय चोरडिया यांनी नमूद केले. कलेच्या माध्यमातून मानसिक आरोग्य चांगले राखता येते, या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *