Headlines

संत तुकोबांच्या पालखीचे 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान:पायी वारीचे वेळापत्रक जाहीर, देहूत जय्यत तयारी; यंदा 25 जुलैला आषाढी एकादशी




मान्सूनच्या पहिल्या सरी बरसल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंगाची आणि आषाढी वारीची. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ म्हणत विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या विठ्ठल भेटीसाठी आतुर झाले आहेत. यंदा २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी असल्याने वारीचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर, जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले असून, ७ जुलै रोजी तुकोबारायांची पालखी देहूतून प्रस्थान करणार आहे. यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने वारकरी संप्रदायाने आत्तापासूनच वारीचे नियोजन सुरू केले आहे. ७ जुलै रोजी जेष्ठ वद्य सप्तमीच्या श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी भक्ती आणि नामस्मरणाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. या सोहळ्यासाठी देहू संस्थानतर्फे जय्यत तयारी सुरू असून, वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पालखी सोहळा प्रमुखांची निवड यंदाच्या वारीचे नेतृत्व करण्यासाठी संस्थानतर्फे सोहळा प्रमुखांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो वारकरी या वारीत सहभागी होतील. नव्या बैलजोड्यांचा सहभाग यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण म्हणजे पालखी रथ आणि चौघडा गाडी ओढण्यासाठी संस्थानच्या वतीने तीन नवीन बैलजोड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या बैलजोड्या यंदाच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन तुकोबांचा रथ ओढण्याचे भाग्य मिळवणार आहेत. माऊलींच्या पालखीचीही उत्सुकता तुकोबारायांच्या पालखीचे वेळापत्रक समोर आल्यानंतर आता विठ्ठलभक्तांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे कधी प्रस्थान होणार? याची अधिकृत घोषणाही लवकरच केली जाणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो दिंड्या, मानाच्या पालख्या आणि लाखो वारकरी आता विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी सज्ज झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *