![]()
सार्वजनिक गणेशोत्सव म्हटले की मंडळांचे पदाधिकारी, युवकांची धावपळ आणि पुरुषांचे नेतृत्व असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र ड्रीम्झ प्राईड परिसरात यंदा हे चित्र बदलले असून, गणेशोत्सवाची संपूर्ण धुरा महिलांनी आपल्या खांद्यावर घेत ‘ड्रीम्झ प्राईडचा राजा’ गणेशोत्सवाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. गणरायाच्या स्वागतापासून ते सजावट, व्यवस्थापन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन आणि पाहुणचारापर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिलांनी समर्थपणे सांभाळत महिला नेतृत्वाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजनाची सूत्रे महिलांच्या हातात आहेत. मंडप सजावट, पूजाविधीची तयारी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, पाहुण्यांचे स्वागत, प्रसाद व्यवस्था, शिस्त आणि समन्वय अशा सर्व बाबी महिलांनी एकत्रितपणे सांभाळल्या आहेत. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता महिलांच्या संघटनशक्तीचा आणि नेतृत्वक्षमतेचा प्रत्यय देणारा ठरला आहे. घर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांसोबत सार्वजनिक उपक्रमांचे व्यवस्थापनही तितक्याच प्रभावीपणे करता येते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. महिला, युवक आणि बालकांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून, गणेशोत्सवाला सामाजिक एकतेचीही जोड मिळाली आहे. विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या आगमनाने ड्रीम्झ प्राईड परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. बाप्पांच्या स्वागतासाठी महिला आणि बालकांनी विशेष तयारी केली होती. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी लेझीमच्या तालावर सादर केलेल्या आकर्षक संचलनाने आगमन सोहळ्याला उत्सवी रंग चढवला. ढोल-ताशांचा निनाद, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि फुलांच्या वर्षावात झालेल्या गणरायाच्या स्वागताने उपस्थितांची मने जिंकली. ड्रीम्झ प्राईडमधील रहिवाशांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, महिलांच्या पुढाकारामुळे उत्सव अधिक शिस्तबद्ध आणि कौटुंबिक वातावरणात पार पडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रेरणादायी उपक्रम परंपरा, संस्कृती आणि आधुनिक विचार यांची सांगड घालत महिला नेतृत्वाखाली साजरा होणारा हा गणेशोत्सव परिसरातील इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. ‘ड्रीम्झ प्राईडचा राजा’च्या माध्यमातून गणरायाची भक्ती, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक एकजूट यांचा सुंदर संगम पाहायला मिळत असून, हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता समाजाला सकारात्मक दिशा देणारा उपक्रम ठरत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात ड्रीम्झ प्राईड परिसर सध्या गणेशमय झाला असून, महिलांच्या नेतृत्वाचा हा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Source link
‘ड्रीम्झ प्राईडचा राजा’ ठरला महिला नेतृत्वाचा नवा आदर्श:महिलांच्या खांद्यावर गणेशोत्सवाची धुरा