आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) एकाच वेळी दोन मोठ्या कारवायांचा धडाका लावत आर्थिक गैरव्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या रॅकेटवर जोरदार प्रहार केला आहे. एका बाजूला 135 कोटी रुपयांच्या बँक फसवणू
.
135 कोटींची बँक फसवणूक; शेल कंपन्यांद्वारे निधीची पळवापळव
बँक फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात ईडीने मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे एकाच वेळी ६ ठिकाणी व्यापक शोधमोहीम राबवली. गजानन गंगामाई इंडस्ट्रीज एलएलपी’ आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. संबंधित कंपनीने विविध बँकांकडून घेतलेल्या तब्बल १३५ कोटी रुपयांच्या कर्जाची अफरातफर केल्याचा प्राथमिक आरोप आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कर्जापोटी मिळालेली ही कोट्यवधींची रक्कम विविध बनावट (शेल) कंपन्यांच्या खात्यांवर वळवण्यात आली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम काढून ती इतरत्र गुंतवण्यात आली. या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंगापूरमधील इंडियन बँकेच्या (Indian Bank) शाखेत ठेवण्यात आलेली ३.७ मिलियन डॉलर्सची (सुमारे ३५.७१ कोटी रुपये) मुदत ठेव (FD) ईडीने तातडीने गोठवली (Freeze) आहे.
अलिशान वाहने व कागदपत्रे जप्त
छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी संशयितांकडून ‘बीएमडब्ल्यू ३२० एलडी ग्रँड लक्झरी लाईन’ ही महागडी कार, अनेक डिजिटल उपकरणे, हार्ड डिस्क आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसच्या मदतीने आंतरराष्ट्रीय सायबर सिंडिकेट उद्ध्वस्त
दुसऱ्या अत्यंत मोठ्या कारवाईत, ईडीने अमेरिकन गुप्तचर संस्था ‘युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिस’ (US Secret Service) सोबत गुप्त माहितीची देवाणघेवाण करून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. पटियाला, पुणे, हैदराबाद आणि चंदिगढ येथे एकूण ४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान पटियाला येथे २ आणि पुण्यात १ असे एकूण ३ पूर्ण क्षमतेने सुरू असलेले बनावट कॉल सेंटर रंगेहाथ पकडण्यात आले. छाप्यावेळी तिथे तब्बल २२० कर्मचारी काम करताना आढळून आले.
अमेरिकन नागरिकांना टार्गेट
ही टोळी व्हीओआयपी, अत्याधुनिक डायलर आणि बनावट कॉलिंग स्क्रिप्टचा वापर करून स्वतःला अमेरिकेतील सरकारी अधिकारी, बँक प्रतिनिधी किंवा तांत्रिक सहाय्यक भासवत असे. खोट्या कारणांची भीती दाखवून अमेरिकन नागरिकांकडून लाखो डॉलर्स उकळले जात होते. पटियाला येथील कॉल सेंटर्सचे प्रत्यक्ष नियंत्रण आणि समन्वय चंदिगढमधील एका आलिशान घरातून गुप्तपणे चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हैदराबाद ते पुणे डॉलर रॅकेट
हैदराबादमध्ये परकीय चलन (बनावट डॉलर) वितरणाचे रॅकेट आढळून आले असून, पुण्यातही अमेरिकन नागरिकांकडून डॉलर्समध्ये उकळलेली रक्कम हवाला किंवा बनावट यंत्रणेद्वारे भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू होते. या कारवाईत ईडीने ६६ मोबाईल फोन्स, १३ लॅपटॉप्स, अनेक हार्ड डिस्क्स, हाय-टेक कम्युनिकेशन उपकरणे, रोख रक्कम आणि आर्थिक लेजर्स जप्त केले आहेत.
ईडीच्या या दुहेरी कारवाईमुळे केवळ देशांतर्गत बँक फसवणूक करणारेच नव्हे, तर देशात बसून परदेशी नागरिकांची कोट्यवधींची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कॉल सेंटर्समागील मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि गुन्ह्यातील पैसा कोणत्या देशांत वळवला गेला, याचा शोध घेण्यासाठी ईडी आणि अमेरिकन यंत्रणांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
——————-
हेही वाचा….
SIT चे कागदी घोडे नकोत, थेट MPSC अध्यक्षांची हकालपट्टी करा!:रोहित पवारांचा सरकारला आठवडाभराचा अल्टिमेटम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि आयोगाच्या कारभारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. “सरकारने केवळ SIT आणि कृतीगटाचे कागदी घोडे नाचवू नयेत. MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांची तत्काळ हकालपट्टी करावी आणि आश्वासनाप्रमाणे ७० हजार पदांची मेगाभरती सुरू करावी. तसे न केल्यास गणेश विसर्जनानंतर पुण्यात पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सरकारला आठवडाभराची मुदत दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी