Headlines

शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी डॉ. अंजली साळवेंची निवड निश्चित!:रोहिणी खडसेंचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; विदर्भाला मिळणार नेतृत्व




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीमध्ये (महिला विंग) लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार असून, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आता विदर्भाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. गेल्या 3 वर्षांपासून या पदावर अत्यंत प्रभावीपणे कार्य करणाऱ्या खान्देशातील नेत्या रोहिणी खडसे यांच्या जागी आता नागपूर विभागातील आक्रमक नेत्या डॉ. अंजली साळवे यांची नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते डॉ. साळवे यांना लवकरच अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले जाणार असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. विदर्भाला नेतृत्व; रोहिणी खडसेंचा 3 वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण पक्षातील फुटीनंतर आणि राजकीय स्थित्यंतरांच्या अत्यंत कठीण काळात रोहिणी खडसे यांनी राज्यभरात दौरे करून महिला आघाडीचे संघटन मजबूत केले. खान्देशातून संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रोहिणी खडसे यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा 3 वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केल्यामुळे पक्षांतर्गत नियमांनुसार आता नवीन नेतृत्वाला संधी दिली जात आहे. या बदलामुळे आता पक्षाकडून रोहिणी खडसे यांच्यावर कोणती नवी मोठी राजकीय जबाबदारी सोपवली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील महिला संघटन अधिक बळकट करण्यासाठी शरद पवारांनी नागपूर विभागाला हे सर्वोच्च पद देण्याचा निर्णय घेतला आहे. आक्रमक चेहरा व कायद्याचा अभ्यास, डॉ. अंजली साळवे यांची पार्श्वभूमी महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड होणाऱ्या डॉ. अंजली साळवे या पक्षाची सडेतोड आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्यासाठी ओळखल्या जातात. राज्य महिला आयोगावरील अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुकीबाबत त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका विशेष गाजली होती. “राज्य महिला आयोग ही राजकीय पुनर्वसनाची जागा नाही. महिलांसाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या आणि महिलाविषयक कायद्यांची सखोल जाण असणाऱ्या व्यक्तींनाच अशा घटनात्मक पदांवर नियुक्त केले जावे,” अशी ठाम मागणी करत त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. महिलांवरील अत्याचार, सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक प्रश्नांवर त्या सातत्याने रस्त्यावर उतरून आवाज उठवत राहिल्या आहेत. त्यांच्या या लढाऊ आणि स्पष्टवक्त्या कार्यशैलीमुळेच पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर हा विश्वास दाखवला आहे. उद्योजक लक्ष्मण बांदल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती महिला आघाडीतील बदलांसोबतच पक्षाच्या मुख्य संघटनेतही महत्त्वाची नियुक्ती करण्यात येणार आहे. हवेली तालुक्यातील वडाचीवाडीचे माजी सरपंच आणि ख्यातनाम उद्योजक लक्ष्मण बांदल यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बांदल यांना अधिकृत नियुक्तिपत्र प्रदान केले. पक्ष संघटनेशी दीर्घकाळ सक्रियपणे जोडलेले राहिलेले बांदल यांनी ही नवी जबाबदारी स्वीकारताना, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
——————————— हेही वाचा… मोदी-शहा हे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते: त्यांच्या पक्षाची घटना गुजराती, निवडणूक आयोग अमित शहांचा घरगडी- संजय राऊत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच वास्तविक एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खरे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे मुख्य कार्यालय गुजरातमध्ये असून, पक्षाचे नेते गुजराती आहेत. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठीच एकनाथ शिंदे गुजराती भाषेत बोलले असावेत, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *