![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच वास्तविक एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खरे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे मुख्य कार्यालय गुजरातमध्ये असून, पक्षाचे नेते गुजराती आहेत. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठीच एकनाथ शिंदे गुजराती भाषेत बोलले असावेत, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, अमित शहा यांना उत्तम मराठी येते आणि नरेंद्र मोदी यांना तर एकनाथ शिंदेंपेक्षाही चांगले मराठी येते. तरीही त्यांना प्रसन्न करण्यासाठी शिंदे तिकडच्या भाषेत बोलले असतील, तर त्यात नवल नाही. कारण त्यांच्या पक्षाची घटनाच मुळात गुजराती आहे. निवडणूक आयोगावर तीव्र ताशेरे संजय राऊत म्हणाले की, देशाचा निवडणूक आयोग गेल्या 10 ते 12 वर्षांपासून अमित शहा यांच्या घरगड्यासारखा काम करत आहे. याच दबावाखाली बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मूळ शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून न्याय मिळाला नाही. इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडूनही न्याय मिळाला नाही. मूळ राजकीय पक्षाचा प्रवाह सुरू राहिला पाहिजे आणि त्याचे अस्तित्व टिकले पाहिजे, परंतु शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देणे हा या दशकातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा संपूर्ण प्रकार प्रचंड दबाव आणि प्रलोभनातून घडवून आणला गेला असून, हा शेकडो कोटींचा घोटाळा आता जनतेच्या समोर येत आहे. तृणमूल काँग्रेसचे उदाहरण आणि लोकशाहीची चिंता संजय राऊत म्हणाले की, तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना ममता बॅनर्जी यांनी केली असून पक्षाची धोरणे त्यांनीच ठरवली आहेत. जे आमदार किंवा खासदार फुटले, त्यांना उमेदवारीही ममता बॅनर्जी यांनीच दिली होती. परंतु अमित शहा यांनी पक्ष फोडला आणि काही लोक बाजूला झाले, म्हणून मूळ पक्ष दुसऱ्या गटाचा कसा होऊ शकतो? ज्यांनी पक्ष स्थापन केला, ते नेते आणि संस्थापक अजूनही अस्तित्वात आहेत. तरीही निवडणूक आयोग दबावाखाली असे निर्णय देत असेल, तर फक्त दिवे लावून देशातील लोकशाही वाचणार नाही. ‘ज्यांच्या घरात चोरी झाली, त्यांनाच चोर मानले जातेय’ संजय राऊत म्हणाले की, आम्ही 10 व्या अनुसूचीची योग्य व्याख्या मांडली आहे. परंतु सध्या देशात विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून, ज्यांच्या घरात चोरी झाली आहे त्यांनाच चोर समजले जात आहे; तर दुसरीकडे प्रत्यक्ष चोरी करणारे मात्र मस्तपैकी बाजूला निघून गेले आहेत.
Source link
मोदी-शहा हे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते:त्यांच्या पक्षाची घटना गुजराती, संजय राऊत यांचा शिंदेंवर हल्लाबोल