Headlines

जरांगे पाटील आमचेही बांधव, सर्व गैरसमज दूर झाले:धाराशिवमध्ये लवकरच 'मराठा भवन' उभारणार असल्याची सरनाईकांकडून घोषणा




धाराशिव जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केलेली पेरणी आणि उभ्या केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिस्थिती नाजूक असल्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांनीही दुष्काळाच्या परिस्थितीबाबत सूचना मांडल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दुष्काळसदृश्य परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने तातडीने मदतीचा आराखडा तयार करणे गरजेचे असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर शासकीय मदत मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’ धाराशिवमधील खरीप पिकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. परतीचा पाऊस झाला तरी सध्या नुकसान झालेल्या अनेक पिकांना त्याचा फारसा फायदा होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे मत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे पीक वाया गेल्याचे गृहीत धरून शेतकऱ्यांना लवकर मदत कशी करता येईल, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू ठेवावी, अशा सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंचनाम्यांसाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक तयारीसह पंचनाम्यांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याचे सरनाईक स्पष्ट केले. पीक नुकसानीची माहिती संकलित करून त्यानुसार मदतीचे नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे. निधी वाटपात पक्षपातीपणा नाही DPC बैठकीत विकासकामांच्या निधीबाबतही चर्चा झाली. कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा खासदार असला तरी त्याच्या मतदारसंघातील पात्र विकासकामांना निधी मिळाला पाहिजे, अशी भूमिका आपण घेतल्याचे सरनाईक यांनी सांगितले. निधी वाटपात कोणताही पक्षपातीपणा केला जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित DPC बैठकीला तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला काही लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याबद्दल सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. अशा महत्त्वाच्या प्रसंगी सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून जिल्ह्यातील प्रश्नांवर एकत्रितपणे चर्चा करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले. जरांगेंच्या आंदोलनाला स्थगिती, तीन महिन्यांची मुदत दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण स्थगित करून सरकारला तीन महिन्यांची मुदत दिल्याच्या निर्णयाचे सरनाईक यांनी स्वागत केले. या तीन महिन्यांच्या कालावधीत मराठा समाजाच्या मागण्यांवर काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जरांगे यांनी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिल्यानंतर त्यांच्या मागण्यांवर सरकारकडून पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे. ‘शिंदेंविरोधात बोलले तर आम्हीही ठाम उभे राहू’ मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरून काही मराठा समाजबांधवांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचा संदर्भ देत सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे हेही समाजबांधव असून त्यांच्याबद्दल कोणतेही अपशब्द वापरले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणी बोलत असेल तर समाजबांधव म्हणून आपल्या नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशीच भूमिका त्यांनी यापूर्वीही मांडली होती. ‘तीन महिन्यांत तोडगा निघेल’ मराठा समाजाच्या मागण्यांपैकी अनेक मागण्या सरकारने मान्य केल्याचा दावा सरनाईक यांनी केला. काही मागण्या कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित असल्याचे सांगत त्यावरही सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील तीन महिन्यांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धाराशिवमध्ये मराठा भवन सुरू करण्याचे आश्वासन मराठा समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी चर्चा करण्यात आली असून धाराशिवमध्ये लवकरच मराठा भवनाच्या कामाला सुरुवात करण्याचेही सरनाईक यांनी सांगितले. मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रताप सरनाईक एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. शेतकरी आणि मराठा आरक्षणाचे प्रश्न केंद्रस्थानी एकीकडे धाराशिवमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे खरीप पिकांचे नुकसान होत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारला दिलेली तीन महिन्यांची मुदत सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पीक नुकसानीची मदत, पंचनामे आणि दुष्काळी उपाययोजनांसोबतच मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकार कोणती पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. SIT चे कागदी घोडे नकोत, थेट MPSC अध्यक्षांची हकालपट्टी करा!:रोहित पवारांचा सरकारला आठवडाभराचा अल्टिमेटम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि आयोगाच्या कारभारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. “सरकारने केवळ SIT आणि कृतीगटाचे कागदी घोडे नाचवू नयेत. MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांची तत्काळ हकालपट्टी करावी आणि आश्वासनाप्रमाणे ७० हजार पदांची मेगाभरती सुरू करावी. तसे न केल्यास गणेश विसर्जनानंतर पुण्यात पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सरकारला आठवडाभराची मुदत दिली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *