![]()
छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ गाव वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर आज शनिवारी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह आमदार-खासदार आणि शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानतर्फे सलग तिसऱ्या वर्षी हा सोहळा अखंडपणे साजरा झाला. सकाळी आठ वाजता 51 मान्यवर जोडप्यांच्या हस्ते सिंहासनारूढ शिवरायांच्या मूर्तीचा सप्तनद्या, समुद्र जल, पंचामृत अशा 16 प्रकारच्या जलांनी सामूहिक अभिषेक करण्यात आला. भगवे फेटे, तुतारीचा निनाद व शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमला. रायगडावर जाऊ न शकणाऱ्या हजारो शिवभक्तांसाठी पितृतीर्थ वेरूळ शिवराज्याभिषेकाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, ‘वेरुळ ही शिवरायांच्या पूर्वजांची भूमी आहे. येथील राज्याभिषेक सोहळा इतिहास जिवंत ठेवणारा आहे.’ यावेळी सावे यांनी शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेवरही भाष्य केले. मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, ‘वेरुळ येथे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला व शिवराज्याभिषेकांना जमलेल्या सर्व शिवभक्तांची स्वागत घडीचे काम हे जोमाने होत आहे. हे महाराजांचे पितृतीर्थ आहे. याचा विकास होऊन याबद्दलची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे व या जागेचे महत्त्व कळाले पाहिजे. ही माहिती पोहोचण्याचे काम प्रत्येक त्याची जबाबदारी आहे व आपली जबाबदारी आहे. यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे. येथे येण्याचे मला सौभाग्य लाभले. मी स्वतःला भाग्यशाली समजतो,’ असेही ते म्हणाले. सोहळ्यास कॅबिनेट मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास बापू भुमरे यांच्यासह अनेक आमदार, जिल्हा परिषद सदस्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. वेरुळ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे घृष्णेश्वराचे मंदिर आहे. राष्ट्रकुट काळात खोदलेले कैलास मंदिर आणि येथील लेणी जगप्रसिद्ध आहेत. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मूळ गावही आहे. वेरुळमध्ये आजही शहाजी राजांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष आहेत. शिवरायांचे आजोबा, पणजोबा अशा दोन पिढ्या येथे राहिल्या. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचा जन्म येथेच झाला. त्यांचे पूर्वायुष्य येथेच गेले. काळाच्या ओढात या गढीचे रूपांतर मातीच्या ढिगाऱ्यात झाले. पुरातत्व खात्याने अलीकडे 2004-2005 दरम्यान येथे उत्खनन केले. तेव्हा या गढीचे खरे स्वरूप समोर आले. या उत्खननामध्ये स्वयंपाकघर, खोल्यांच्या जोत्यांचे अवशेष, पूर्व-पश्चिम भिंतीचा काही भाग, दोन धान्य कोठार, स्नानगृह असे अवशेष समोर आले.
Source link
शिवरायांच्या मूळ गावचा राज्याभिषेक सोहळा:वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा