![]()
शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी विविध राजकीय घडामोडींवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कथित धर्मांतर आणि फसवणुकीच्या प्रकरणाचा संदर्भ देत शिरसाट म्हणाले की, ‘निदा खान प्रकरण’ हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे आणि आता त्याचा प्रत्यय येत आहे. संजय शिरसाट म्हणाले की, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी गंभीर प्रकरणे समोर आली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. संभाजीनगरमधील घटनेत एक विवाहित महिला आपली दोन मुले आणि पतीला सोडून एका व्यक्तीच्या नादी लागते, तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते, असे धक्कादायक प्रकार शहरात सुरू आहेत. पोलिसांनी इतर गोष्टींपेक्षा अशा संवेदनशील विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, अन्यथा यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होऊ शकते. शहरातील अनेक महिला गायब झाल्या असून पोलिसांनी या प्रकारांचा गांभीर्याने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. राऊतांकडून उबाठाच्या तक्रारीसाठी राज ठाकरेंची भेट संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या कथित भेटीवर बोलताना शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली. निवडणूक मतपत्रिकेवर व्हावी, ही भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खूप आधीच जाहीर केली होती. त्यामुळे हा निरोप घेण्यासाठी किंवा देण्यासाठी राऊत त्यांची भेट घेतील, यात मला काही तथ्य वाटत नाही. कदाचित उबाठा पक्षाच्या अंतर्गत तक्रारी करण्यासाठीच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला गेले असावेत. संजय राऊत यांनी कोणावरही आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या पक्षाच्या परिस्थितीकडे आणि ‘आपल्या बुडाखाली काय जळतंय’ याकडे आधी पाहावे, असा टोला त्यांनी लगावला. कार्यकर्त्यांनी काँग्रेससोबत न राहिलेलेच बरे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषद निवडणुकीवरून केलेल्या वादग्रस्त विधानाचा शिरसाट यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. निवडणुकीत उमेदवार विकले गेल्याचा आरोप करताना वडेट्टीवारांनी राजकारणाची तुलना ‘वेश्ये’शी केली होती. यावर आक्षेप घेत शिरसाट म्हणाले की, इतकी वर्षे सोबत काम करणाऱ्या स्वतःच्याच कार्यकर्त्यांना अशा शब्दांत संबोधणे अतिशय चुकीचे आणि गैर आहे. सत्तेसाठी कोणत्याही तडजोडी करणाऱ्या महाविकास आघाडीकडे आता कार्यकर्ते टिकत नसल्याने, नेत्यांचे स्वतःच्या बोलण्यावरील भान सुटले आहे. 2019 मध्ये जेव्हा ‘उबाठा’ पक्ष काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारायला हवी होती? त्यावेळी जर कोणी तुम्हाला या शब्दांत टोकले असते तर कसे वाटले असते, असा सवाल त्यांनी केला. पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने जर एखाद्या कार्यकर्त्याने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, तर त्याला दोष देणे चुकीचे असून अशा नेत्यांसोबत कार्यकर्त्यांनी न राहिलेलेच बरे, असेही ते म्हणाले. वडेट्टीवारांची मानसिक स्थिती बिघडली संजय शिरसाट म्हणाले की, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू असताना वडेट्टीवार थेट देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर कारवाईची मागणी करत आहेत, यावरून त्यांची मानसिक स्थिती बिघडली असून त्यांच्यावर वेड्याच्या रुग्णालयात उपचार करण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका शिरसाट यांनी केली. त्यामुळे वडेट्टीवारांच्या अशा वक्तव्यांना आपण अजिबात गांभीर्याने घेत नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला. नोटीस येणं मोठी गोष्ट नाही आमदार वैभव नाईक यांना मिळालेल्या नोटीसवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, राजकीय कार्यकर्त्यांना अशा नोटिसा मिळणे ही नियमित प्रक्रिया आहे. जर त्यांनी या नोटिसीला समाधानकारक उत्तर दिले, तर पुढे कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे यात राजकारण शोधण्याची गरज नाही.
Source link
निदा खान प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रभर:संभाजीनगरमधील कथित धर्मांतर प्रकरणावरून संजय शिरसाट आक्रमक, वडेट्टीवारांवर वेड्याच्या रुग्णालयात उपचार करण्याची वेळ