![]()
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. मविआचे अधिकृत उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. ज्या व्यक्तीने पंढरपूर पंचायत समिती सभापती निवडणुकीत पक्षाचा ‘तुतारी’चा उमेदवार पाडून भाजपच्या उमेदवाराला निवडून आणले, त्यांना आपण मदत कशी करावी, असा सवाल आमदार पाटलांनी उपस्थित केला आहे. अभिजीत पाटील म्हणाले की, या संदर्भात शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. मला या उमेदवारीबाबत आणि अर्ज भरण्याबाबत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले, मविआ उमेदवाराला कदाचित आमच्या मतांची गरज नसावी, म्हणून त्यांनी आमच्याशी काही संवाद साधला नाही, उलट महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी संपर्कात राहून भेटीची इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. योग्य वेळी राजकीय धडा शिकवण्याचा आणि दुसरा पर्याय निवडण्याचा इशारा आमदार पाटलांनी दिल्यामुळे मविआत चिंतेचे वातावरण आहे. पक्षाने अचानक उमेदवार दिला अभिजीत पाटील म्हणाले की, सोलापूर विधान परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढवणार हेच माहिती नव्हते. अर्ज भरताना सुद्धा आम्हाला माहिती नव्हती. अजूनपर्यंत आम्हाला विचारात घेण्यात आलेले नाही. त्यांना आमच्या मताची गरज नसेल ते निवडून आले असतील तर आम्हाला पर्याय निवडाला लागेल. कोणाला राजकीय धडा शिकवायचा हे आम्हाला ठरवावे लागेल. आम्हाला जर बैठकीला बोलवले असते तर आम्ही विरोधात गेलो नसतो ना? असे अभिजीत पाटील यांनी म्हटले आहे. 600 अदृश्य मतदार मविआच्या पाठीशी- खासदार धैर्यशील मोहिते-पाटील दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत 600 अदृश्य मते महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचा दावा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सोमवारी येथे केला. मोहिते-पाटील कुटुंबीयांचा एकही सदस्य निवडणूक रिंगणात नाही. तरीसुध्दा आमच्या कुटुंबीयांवर टीका केली जाते. कारण त्याशिवाय पालकमंत्र्यांचे दुकान चालत नाही अन् त्यांना करमतही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप, महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. विशेष म्हणजे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हे सर्वच पक्षातील मतदारांच्या भेटी घेत आहेत. त्यांनी महायुतीच्या खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची सोमवारी भेट घेतली. मोहिते- पाटील हे प्रत्येक वेळी 600 अदृश्य मतदार पाठीशी आहेत असा दावा करत आहेत. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत मविआचे उमेदवार वसंत देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
सोलापूर विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अभिजीत पाटलांचा विरोध:म्हणाले- पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कसे मतदान करणार