Headlines

प्राथमिक, सेवानिवृत्त शिक्षकांचे लाक्षणिक आंदोलन:निवृत्तीवेतन देण्याच्या मागणीसाठी चेतना कर्मचारी संघटना आक्रमक




महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला होत नसल्याने, या विरोधात मंगळवार, ९ रोजी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. ‘चेतना कर्मचारी संघटना’ आणि जिल्हा परिषदेचे प्राथमिक व सेवानिवृत्त शिक्षक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य स्तरावरून जिल्हास्तरावर वेतन निधी वेळेत प्राप्त होऊनही जिल्हा परिषद प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे वेतन नेहमी विलंबाने होते. शिक्षकांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन वेतन असल्याने मुलांचे शिक्षण, कौटुंबिक आरोग्य उपचार आणि बँकांच्या कर्जाचे हप्ते (ईएमआय) वेळेवर भरताना त्यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरमहा १ तारखेला वेतन झाल्यास कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य लाभू शकते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेलाच नियमितपणे अदा करण्यात यावे, सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्तीवेतन (पेन्शन) देखील दरमहा १ तारखेला जमा व्हावे, कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतन विषयक कामाचा भार एकाच लिपिकावर न टाकता, तो विभागून किमान दोन लिपिकांकडे सोपवण्यात यावा, वेतन देयक जिल्हा कोषागार कार्यालयात सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंजूर करण्यात यावे, जिल्हा स्तर व पंचायत समिती स्तरावर वेतन विषयक चौकशी केली असता सत्य व अचूक माहिती उपलब्ध करून दिली जावी, जिल्हा व पंचायत समिती स्तरावर वेतन विलंबाबाबत दिलेल्या निवेदनांवर आणि तक्रारींवर काय कारवाई झाली, याचे लेखी उत्तर संबंधित व्यक्तीस मिळावे, मागण्या करण्यात आल्या. “शिक्षकांचे वेतन वेळेवर न होण्यामागील अनियमितता कायमस्वरूपी थांबवण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे,” अशी माहिती चेतना कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सत्येंद्र अभ्यंकर यांनी दिली. यावेळी सत्यंदु अभ्यंकर, मनोज कावरे, प्रवीण शेंदरे, सुनील बनसोड, हरीश राणे, अशोक कुऱ्हाडे, शैलेश माकोडे, निलेश चौधरी, अरुण परतेती, किशोर गणवीर, जयप्रकाश चिठोरे, राजेंद्र जाधव, निखिल पाचघरे, चंद्रशेखर मावंदे, प्रवीण बाखडे, विनायक पवार, गणेश राठोड, छत्रपती ढवळे, मोहन चवरे, चंद्रशेखर दाळू, अनिल भाकरे, निलेश रसे, घनश्याम अरमळ, विकास रेखाते, साहेबराव चरतेती, सचिन डोंगरे, प्रकाश ठाकरे, राजू ढेरे, महेंद्र मेटकर इत्यादी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *