![]()
पुणे आणि परिसरात महिलांमध्ये रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या ‘क्लॉटिंग फॅक्टर’च्या कमतरतेची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर आठवड्याला सुमारे २ ते ३ महिलांमध्ये रक्तस्त्रावासंबंधी विकारांची लक्षणे आढळत आहेत. वेळीच निदान न झाल्यास हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, असा इशारा डॉ. श्रीवास्तव यांनी दिला आहे. ‘व्हॉन विलिब्रँड डिसीज’ हा महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक आनुवंशिक विकार आहे, ज्यामुळे रक्त योग्य प्रकारे गोठत नाही. याशिवाय, अनेक महिला हिमोफिलियाच्या वाहक असू शकतात. यकृताचे आजार, संसर्ग, हार्मोन्सचे असंतुलन आणि व्हिटॅमिन ‘के’ ची कमतरता ही देखील रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील अडथळ्यांची प्रमुख कारणे आहेत. या आजाराची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये असामान्य किंवा दीर्घकाळ मासिक पाळी येणे, शरीरावर वारंवार निळे डाग पडणे, हिरड्यांतून रक्त येणे, तसेच किरकोळ दुखापतीनंतर किंवा शस्त्रक्रियेनंतरही सतत रक्तस्त्राव होणे ही या विकाराची प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा महिला ही लक्षणे मासिक पाळी किंवा हार्मोन्सचा त्रास समजून दुर्लक्ष करतात. डॉ. पद्मा श्रीवास्तव यांच्या मते, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहाराच्या सवयी, वाढता ताण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. निदानास होणारा विलंब हे या आजारातील मोठे आव्हान आहे. मात्र, वेळीच निदान झाल्यास ‘क्लॉटिंग फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी’ आणि रक्तस्त्राव नियंत्रित करणाऱ्या औषधांद्वारे महिला सामान्य आयुष्य जगू शकतात. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. असामान्य किंवा अति रक्तस्त्रावाच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेतल्यास संभाव्य गुंतागुंत टाळता येऊ शकते, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
Source link
महिलांमध्ये क्लॉटिंग फॅक्टरच्या कमतरतेत वाढ:वेळीच निदानाची गरज- डॉ. पद्मा श्रीवास्तव