![]()
दहीवी ते वणी या रस्त्याची गेल्या पाच ते सहा वर्षांपासून झालेली दूरवस्था आणि रखडलेले काम याविरोधात संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रस्त्यावरील दगड उचलून हातात निषेधाच्या पाट्या घेत नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दहीवी-वणी मार्गाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. मात्र, रस्ता उकरून त्यावर खडी आणि मोठे दगड टाकल्यानंतर काम अपूर्ण अवस्थेतच सोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालवणे धोकादायक बनले असून, पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे गरोदर महिलांना रुग्णालयात नेताना अडचणी निर्माण होत असून, काही प्रसंगी रस्त्यातच प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचाही दावा ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर माळेगाव काजीच्या सरपंच रचना गायकवाड, उपसरपंच लकाबाई गांगोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यामध्ये जाई जोपळे, फुलाबाई चौधरी, शकुंतला बोराडे, रघुनाथ उघडे, पुंडलिक माळेकर, प्रवीण गोतरणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
Source link
पाच वर्षांपासून रखडलेल्या वणी रस्त्यासाठी आंदोलन:खडी-दगडांवरून प्रवास त्रासदायक; ग्रामस्थ आक्रमक