![]()
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गुटखा, तंबाखू आणि पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर आता थेट मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना कडक आदेश
.
अनेक वर्षांपासून केवळ किरकोळ विक्रेते किंवा टपरीवाले सापडत असल्याने मुख्य सूत्रधार मोकाट राहत होते. आता मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्याने माफियांचे धाबे दणाणले आहेत. प्रामाणिक व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, हेही स्पष्ट केले आहे. ही कारवाई सार्वजनिक आरोग्याविरुद्धचा गंभीर गुन्हा मानून केली जाईल. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर न थांबता गुटखा उत्पादक, पुरवठादार, फायनान्सर, वाहतूकदार आणि गोदाम मालक अशा साखळीचा पुराव्यांसह छडा लावून नेटवर्क उध्वस्त केले जाईल.
१७ दिवसांत कोट्यवधींचा अवैध मुद्देमाल जप्त
एफडीएचे आयुक्त म्हणून मुंढे यांनी पदभार स्वीकारताच २५ मे ते ११ जून या १७ दिवसांत धडक मोहीम राबवली. या काळात तब्बल ३ कोटी २७ लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला व ३५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
मकोका लावण्यासाठी तीन निकष तपासले जातील
१. गुन्हा दखलपात्र असून त्यात ३ वर्षे किंवा अधिक शिक्षेची तरतूद असावी. २. दुसरा, मागील १० वर्षांत एकापेक्षा अधिक आरोपपत्रे दाखल असावीत. ३. दोन किंवा अधिक व्यक्तींनी संघटितपणे हा गुन्हा केलेला असावा.
अवैध व्यापारावर संघटित गुन्हेगारी मानूनच कारवाई केली जाणार
राज्यभरात कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक व्यापाऱ्यांना कोणताही त्रास देणे हा या कारवाईचा उद्देश नाही. मात्र, सार्वजनिक आरोग्याला हानी पोहोचवून संघटितपणे अवैध व्यापार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. केवळ अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन नसून सार्वजनिक आरोग्याविरुद्धचा गंभीर संघटित गुन्हा मानूनच ही कारवाई केली जाईल.-तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
दूध भेसळप्रकरणीही डेअरी चालकांना सक्त ताकीद
मुंढे यांनी दूध भेसळीवरही लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईत डेअरी चालकांची बैठक घेऊन त्यांनी सक्त सूचना दिल्या. दुधात पाणी किंवा रसायनांची भेसळ खपवून घेतली जाणार नाही. ग्राहकांपर्यंत जाणारे दूध सुरक्षित, दर्जेदारच असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट सुनावले आहे.