![]()
पुणे शहरातील हडपसरमधील एका उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी एका सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील ७ लाख ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३९ वर्षीय महिला हडपसरमधील अमानोरा सोसायटीत राहतात. सकाळी त्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले आणि शयनगृहातील कपाट उचकटून दागिने चोरले. दुपारी १२ च्या सुमारास महिला घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. अमानोरा सोसायटीत घरफोडी झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार पुढील तपास करत आहेत. दरम्यान, लोहगाव भागातही घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोकड असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कुटुंब बाहेरगावी गेले असताना ही चोरी झाली. लोहगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. याशिवाय, वानवडी येथील जगतापनगर भागात एका सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ३५ हजार रुपयांचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरला. उन्हाळ्यामुळे महिलेने घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार एन. महाडिक या घटनेचा तपास करत आहेत.
Source link
पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा घरफोडी:7.38 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, पोलिसांकडून तपास सुरू