Headlines

दोन सरकारी नोकऱ्या सोडून अजिंक्य ढोके पीएसआय झाले:शिवणी रसुलापूरच्या अजिंक्य ढोकेच्या जिद्दीला गावकऱ्यांनी मिरवणुकीने दिली सलामी




नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथील अजिंक्य सुनंदाताई ओंकार ढोके यांची मुंबई पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी यापूर्वीच्या दोन सरकारी नोकऱ्यांचा त्याग केला होता. त्यांच्या या जिद्दीचे आणि यशाचे कौतुक म्हणून गावकऱ्यांनी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. महाराष्ट्र पोलीस अकादमीत वर्षभराचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या ५८३ प्रशिक्षणार्थींमध्ये अजिंक्य ढोके यांनी ४५ वी रँक मिळवली. त्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर हे यश संपादन केले आहे. अजिंक्य ढोके हे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा, शिवणी येथे पूर्ण केले. अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या अजिंक्य यांनी अनेक अडचणींवर मात करत शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. कोणत्याही कोचिंग क्लासला न जाता, केवळ कर्तव्यनिष्ठा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले. यापूर्वी अजिंक्य यांची नांदगाव खंडेश्वर येथे आरोग्य सेवक म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांची नागपूर येथे तलाठी पदावरही निवड झाली. मात्र, पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि त्या दोन्ही नोकऱ्यांचा त्याग करून अखेर मुंबई पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. प्रशिक्षण पूर्ण करून गावात आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांनी मिरवणूक काढून अजिंक्यचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावातील विविध ठिकाणी त्यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शिवणी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *