![]()
लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित खासदारांची तातडीची बैठक घेत पक्षाची एकजूट दाखवून दिली. या बैठकीला सर्व नऊ खासदार उपस्थित होते, ज्यापैकी चौघांनी प्रत्यक्ष, तर ५ जणांनी ऑनलाइन सहभाग नोंदवल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. आगामी लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य बंडखोरीच्या चर्चा खोडून काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. यात अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित ५ खासदारांनी आॅनलाइन हजेरी लावत बैठकीचा हेतू सार्थकी लावला. आपली पक्षनिष्ठा ग्राउंडवरही स्पष्ट करण्याचे ठाकरेंचे खासदारांना निर्देश कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, तो दूर करा. आपण सर्वजण पूर्ण ताकदीने पक्षासोबत एकनिष्ठ आहोत, ही भूमिका ग्राउंडवर स्पष्ट करा. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारकडून होणाऱ्या विलंबावर व त्रुटींवर आवाज उठवा. महागाई, शेतकऱ्यांचे रखडलेले प्रश्न, ग्रामीण समस्यांवर रस्त्यावर उतरून आंदोलने करा अशा सूचना ठाकरेंनी खासदारांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ५ खासदार या कारणांमुळे ऑनलाइन १. नागेश आष्टीकर (हिंगोली): मुलाच्या विधान परिषद निवडणुकीच्या कामात व्यस्त. २. संजय देशमुख (यवतमाळ): मुलीच्या लग्नाचे नियोजन सुरू असल्याने अनुपस्थित. ३. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी): पत्नीच्या आजारपणाने सोबत राहणे गरजेचे म्हणून ऑनलाइन. ४.ओमराजे निंबाळकर (धाराशिव): मुलगा पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयात दाखल. ५. संजय ऊर्फ बंडू जाधव(परभणी): वैयक्तिक कारण. पक्षांतराचा धोका नसल्याचे दाखवण्यात तूर्तास यश महायुतीतील विशेषतः शिंदे गटातील नेत्यांकडून असा दावा केला जात होता की, ठाकरे गटातील ७ खासदार लवकरच सत्ताधारी पक्षात प्रवेश करतील किंवा स्वतंत्र गट स्थापन करून पाठिंबा देतील. ठाकरे गटाला खिंडार पाडण्याच्या या कथित मोहिमेला राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले गेले. हाच संभाव्य धोका ओळखून खासदारांना एकत्र बांधून ठेवण्याच्या उद्देशाने तसेच एकजूट सिद्ध करण्याच्या उद्देशाने ही बैठक बोलावली होती, जी यशस्वी झाली.
Source link