![]()
भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल घेऊन त्यांना शाळेची आत्मीय ओळख करून देण्यात आली. विद्यार्थिनींसाठी हातावर मेहेंदी आणि नेलपेंटची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुगे, आकर्षक रांगोळ्या आणि स्वागतफलकांनी सजविण्यात आला होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यातील भीती व संकोच दूर करण्याचा प्रयत्न केला. नवीन शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आनंददायी आणि संस्मरणीय व्हावी, या उद्देशाने विविध स्वागत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता आणि संपूर्ण कॅम्पसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्राचार्य पंकज दात्रे यांनी शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता, सुरक्षितता आणि शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी प्रवेशोत्सवासारखे उपक्रम उपयुक्त ठरतात, असे सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे, शाळा विकास अधिकारी निर्मला येवला, अरुण ततार, नंदकिशोर शेवाळे आदी उपस्थित होते. प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील शाळेविषयीची भीती दूर करून त्यांना आनंददायी वातावरणात शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुष्पवृष्टी, औक्षण, मेहेंदी, नेलपेंट, आकर्षक सजावट आणि शिक्षकांचा जिव्हाळ्याचा संवाद यामुळे चिमुकल्यांचा शाळेतील पहिलाच दिवस अविस्मरणीय ठरला.
Source link
भाक्षीत रांगोळ्या पुष्पवृष्टी व चिमुकल्यांचे औक्षण:रंगीबेरंगी सजावट आणि विविध उपक्रमांतून शैक्षणिक प्रवासाची सुरूवात