Headlines

दिव्य मराठी विशेष‎:एसटीची 10% हंगामी भाडेवाढ महिनाभर कायम, डिझेल दरवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचे दिले कारण




उन्हाळी सुट्ट्या संपल्या तरी लालपरीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला बसणारा कात्रीचा विळखा तूर्तास कायम राहणार आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साध्या बससेवांसाठी लागू केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ आणखी एक महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुधारित वाढीव भाडेदर १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन प्रवासी वाहतुकीचे नियोजन आणि महसूल वाढवण्यासाठी १५ एप्रिल २०२६ पासून ही १० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली होती. या भाडेवाढीची मुदत १५ जून रोजी संपणार होती. मात्र, डिझेलच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि त्यामुळे महामंडळावर पडणारा प्रचंड आर्थिक भार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ आणि त्याचा तिजोरीवर होणारा परिणाम. या दोन मुख्य कारणांमुळे महामंडळाला हा नाइलाजास्तव निर्णय घ्यावा लागला आहे. सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळालेला नसला तरी पूर्वीचेच वाढीव दर पुढील महिनाभर कायम राहतील. महामंडळाने सर्व विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज रात्री १२ नंतरही प्रवाशांना साध्या बससाठी वाढीव दरानेच तिकीट काढावे लागणार आहे. प्रौढांसाठी १४ रुपये किमान भाडे कायम साध्या आणि इतर बससेवांचे भाडे प्रति टप्पा ११.०५ रुपये असेच राहील. तसेच, प्रौढांसाठी १४ रुपये आणि लहान मुलांसाठी ७ रुपये हे किमान भाडेदेखील कायम राहणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ करून तो ५८ टक्के करण्याची घोषणा केली होती. यामुळे हा भत्ता आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याइतका झाला आहे. यामुळेच ही भाडेवाढ कायम ठेठवल्याचे सांगण्यात आले आहे. ३०० कोटी रुपयांचा फटका राज्यात १४ हजार ५०० बसेस रस्त्यावर धावत असून वर्षाला ३४०० कोटी रुपयांचे डिझेल लागते. डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे वर्षाला तब्बल ३०० कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. हा आर्थिक भार सहन करणे महामंडळाच्या कक्षेबाहेर गेले आहे. त्यामुळे तिकीट दरात वाढ करण्याचे संकेत परिवहनमंत्र्यांनी दिले होते. मात्र एप्रिल महिन्यातच १० टक्के तिकीट दरवाढ केल्याने महामंडळाने लगेच निर्णय न घेता वाढ केली आहे. त्यामुळे एक महिन्यानंतर महामंडळ दरवाढ कायम ठेवते का याकडे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *