Headlines

कुराश असोसिएशनची मानवाधिकार संस्थेविरोधात तक्रार:खेळाडूंच्या हितासाठी आक्रमक भूमिका; धायगुडेंवर बदनामीचा आरोप




कुराश असोसिएशन महाराष्ट्राने मानवाधिकार संरक्षण आणि जागरूकता संस्थेविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित संस्थेकडून कुराश खेळ, खेळाडू, क्रीडा प्रमाणपत्रे, खेळाडू आरक्षण आणि पोलीस भरती प्रक्रियेशी संबंधित विषयांमध्ये सातत्याने हस्तक्षेप करून विविध शासकीय विभागांकडे तक्रारी करण्यात आल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. ही तक्रार धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्याकडे करण्यात आली आहे. मानवाधिकार संस्थेच्या या कृतींमुळे खेळाडूंचे मनोधैर्य खच्ची होत असून कुराश खेळाची प्रतिमा मलिन होत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. असीम सरोदे, शिवाजी साळुंखे, खेळाडू शिवशरण माने, प्रकाश माळवदकर, ओंकार विभुते, ॲड. बाळकृष्ण निढाळकर आणि मल्लिनाथ देडे पाटील आदी उपस्थित होते. यावेळी असोसिएशनने आपली भूमिका स्पष्ट केली. असोसिएशनच्या माहितीनुसार, कुराश खेळाडूंना देण्यात आलेली क्रीडा प्रमाणपत्रे ही क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आवश्यक पडताळणीनंतर वैध ठरविण्यात आलेली आहेत. अशा परिस्थितीत वारंवार आक्षेप घेऊन तक्रारी करणे हे खेळाडूंच्या भविष्यासाठी हानिकारक असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. यासोबतच, हनुमंत धायगुडे नावाच्या व्यक्तीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुराश असोसिएशन महाराष्ट्र, त्याचे पदाधिकारी आणि खेळाडूंविषयी दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे अनेक खेळाडूंच्या क्रीडा कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे असोसिएशनने नमूद केले. कुराश हा अधिकृत नियमांनुसार विशेष क्रीडा मॅटवर खेळला जाणारा खेळ आहे. याबाबत शासन निर्णय आणि तांत्रिक नियमावली स्पष्ट आहे. मात्र, काही तक्रारींच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना फरशीवर खेळण्यास सांगण्यात आल्याने खेळाच्या तांत्रिक निकषांबरोबरच खेळाडूंच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे मिळणाऱ्या आरक्षण व भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी स्पष्ट धोरण आणि कायदेशीर प्रक्रिया असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कुराश असोसिएशन महाराष्ट्राने राज्य शासन, क्रीडा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *