![]()
पुण्यात एका तीन वर्षांच्या बालकाला डॉक्टरांनी नवजीवन दिले आहे. घरात खेळताना गरम चिंचेच्या रसात पडून तो ६० टक्के भाजला होता. प्राथमिक उपचारादरम्यान त्याचे हृदयाचे ठोकेही थांबले होते. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ४० दिवसांहून अधिक काळ उपचार करून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. आता त्याला रुग्णालयातून सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे. थेरगाव येथील रहिवासी असलेल्या हरीश (नाव बदललेले) नावाच्या तीन वर्षांच्या मुलासोबत हा अपघात घडला. घरात खेळत असताना तो वडिलांनी चाट सेंटरसाठी तयार केलेल्या गरम चिंचेच्या रसाच्या मोठ्या भांड्यात पडला. या घटनेत त्याची छाती, पाठ, पोट, चेहरा, मान, हात, पाय आणि शरीराचे संवेदनशील भाग गंभीररीत्या भाजले. त्याच्या शरीराचा सुमारे ५५ ते ६० टक्के भाग भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. अपघातानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचारादरम्यान त्याची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याला कार्डियाक अरेस्ट आला, म्हणजेच त्याचे हृदयाचे ठोके थांबले. या गंभीर स्थितीत त्याला पुण्यातील ‘अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन’ येथे हलवण्यात आले. अंकुरा हॉस्पिटलमध्ये बाल अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. मिलिंद जंबगी आणि प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा हरीशची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आणि चोवीस तास त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. डॉ. मिलिंद जंबगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० टक्के भाजलेल्या रुग्णांमध्ये संसर्ग, शॉक आणि अनेक अवयव निकामी होण्याचा धोका जास्त असतो. कार्डियाक अरेस्टमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. डॉक्टरांचे पहिले उद्दिष्ट हरीशचे अवयव सुरळीत कार्यरत ठेवणे, संसर्ग रोखणे आणि वेदना कमी करणे हे होते. उपचारांमध्ये कोलाजेन ड्रेसिंग, विशेष आयसीयू व्यवस्थापन आणि पोषक आहारावर भर देण्यात आला. प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले की, इतक्या गंभीर स्थितीतही संपूर्ण उपचार काळात बालकाला एकदाही संसर्ग झाला नाही, हे वैद्यकीय पथकाच्या अचूक जखम व्यवस्थापनाचे मोठे यश आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि हरीशच्या उपचारांना मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याला पूर्णपणे बरे करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्याची सर्व औषधे बंद असून तो सामान्य जीवन जगत आहे.
Source link
गरम रसात पडून 60 टक्के भाजलेला चिमुकला:हृदयाचे ठोके थांबूनही पुण्यातील डॉक्टरांनी दिले नवे आयुष्य