Headlines

रस्ते जलमय:अहिल्यानगर शहरात मान्सूनपूर्व पावसाची वर्दी; दिवसभर उकाडा, सायंकाळी 65 मिनिटे बरसला




गेल्या १८ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी शहर व परिसरात हजेरी लावली. यंदाच्या हंगामात शहरात प्रथमच ६५ मिनिटे मान्सूनपूर्व पाऊस बरसला. शहरात झालेल्या पावसाने ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. त्याचबरोबर अनेक भागांत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहनधारकांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात अवघा २१.५ मिमी मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. मात्र, झालेला पाऊस सर्वदूर समान स्वरूपाचा नव्हता. जिल्ह्यात १ ते १८ जून या कालावधीत सरासरी ५७ मिमी पाऊस होत असतो. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनच्या पहिल्या १८ दिवसांत ३१ मिमी पावसाची तूट निर्माण झाली होती. २०२४ मध्ये १४ तालुक्यांपैकी ९ तालुक्यांत १८ जूनपर्यंत १०२ ते २३२ मिमी पाऊस झाला होता. यंदा पाऊस लांबल्याने खरीपाच्या पेरण्यादेखील खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात १४ जूनपासून मान्सूनच्या पावसाचा अंदाज देण्यात आला होता; मात्र तो फोल ठरला. मान्सूनचे आगमन अद्याप झालेले नाही. १४ ते १७ जून या कालावधीत दिवसभर कडक ऊन जाणवत होते. गुरुवारी दिवसभर तापमानाचा पारा ३७.९ अंशांवर होता, तर आर्द्रताही ७१ टक्क्यांपर्यंत वाढली होती. त्यामुळे नागरिकांना दिवसभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.अधूनमधून ढगाळ वातावरण होत होते, मात्र पाऊस हुलकावणी देत होता. अखेर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. शहर व परिसरात तब्बल ६५ मिनिटे पाऊस सुरू होता. प्रामुख्याने सावेडी, पाइपलाइन रोड या भागांत जोरदार पाऊस झाला. केडगाव, भिंगार आणि कल्याण रोड परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट गुरुवारी शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या दोन दिवसांत दुपार किंवा सायंकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, त्यासोबत विजांचा कडकडाटही होऊ शकतो. काही ठराविक भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. सोलापूरजवळ अडकला मान्सून ^ सध्या होत असलेला पाऊस हा मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व आहे. पश्चिमी विक्षोभ आणि हवेत चक्रीय वाऱ्यांचे परिसंचरण सुरू आहे. त्यामुळे दक्षिणेकडून सरकणारा मान्सूनचा प्रवास थांबला आहे. सोलापूरपर्यंत मान्सूनचे ढग येत असले, तरी ते पुढे सरकत नसल्याने मान्सूनचा पुढील प्रवास लांबणीवर पडला आहे. जिल्ह्यात २० जूननंतर मान्सूनचा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे. – रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *