![]()
गौडगाव (ता. बार्शी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ मोहीम अंतर्गत सर्व रोग निदान व उपचार शिबिर सोमवारी आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये ४३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १९ गावातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता, तसेच सरहद्दीवर असलेल्या गावांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनीही या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या भारती दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी पंचायत समितीचे सदस्य संजय भड, सदस्या सविता साबळे, सरपंच वैशाली भारत पैकेकर, विविध पदाधिकारी, नागरिक व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये डॉ. श्रीराम नरवडे, डॉ. श्वेता नरवडे, डॉ. मोनिका केदार-जाधवर, डोळे तपासणीसाठी प्रियांका खंडेलवाल व लेप्रोसीसाठी साळुंखे यांचे सहकार्य लाभले. १९ गावांचा आरोग्याचा प्रश्न व आरोग्य सेवा या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. परंतु, या आरोग्य केंद्रामध्ये एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने सेवा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे गौडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करून या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सामान्य आणि गरीब नागरिकांना आवश्यक असणारे ऑपरेशन थिएटर व कक्ष, जे यापूर्वी सुरू होते ते गेल्या दहा वर्षांपासून बंद असून या सर्व सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली. गौडगावात झालेल्या शिबिरामध्ये ३२ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. तसेच, ३० वर्षांवरील महिला (शुगर व कॅन्सर तपासणी) केली. ९२, कुष्ठरोग व त्वचेचे आजार असलेले ४५, किशोरवयीन मुली तपासणी ३८, डोळ्यांची तपासणी ३२, किरकोळ औषधी उपचार १४७, अशा एकूण ४३६ नागरिकांची तपासणी केली आहे. या शिबिरामुळे गावातील लोकांना आरोग्याचे महत्त्व कळून आले.
Source link
गौडगाव येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव शिबिर:गरोदर माता, त्वचेचा आजार, महिलांची शुगर व कॅन्सर अशा विविध तपासण्या