![]()
जागतिक पितृदिनानिमित्त जय गणेश व्यासपीठाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात समाजसेवक राहुल देशमुख यांनी दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. शारीरिक उणीवांवर मात करून विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या दिव्यांगांना केवळ पुरस्कार देणे पुरेसे नाही, तर त्यांना सन्मानाने उदरनिर्वाह करता येईल अशी साधने उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम साईनाथ मंडळ ट्रस्ट, एकता मित्र मंडळ, श्री शिवाजी मित्र मंडळ, वीर शिवराज मित्र मंडळ आणि अचानक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग मुलांच्या पित्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अंध सनदी लेखापाल व शास्त्रीय गायक भूषण तोष्णीवाल यांचे वडील नंदकिशोर तोष्णीवाल, कर्णबधिर भरतनाट्यम नर्तिका प्रेरणा सहाणे यांचे वडील केशव सहाणे, दिव्यांग नर्तिका सायली आगवणे यांचे वडील नंदकिशोर आगवणे तसेच राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू गौरी गाडगीळ यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘यलो’ चित्रपटामुळे प्रसिद्ध असलेल्या गौरीचे वडील शेखर गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. राहुल देशमुख आणि साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. देशमुख पुढे म्हणाले की, दिव्यांग असूनही या मुलांनी सर्वसामान्य व्यक्तींनाही कठीण वाटतील अशी अनेक कार्ये करून दाखवली आहेत. त्यांच्या भविष्यासाठी शासनाने विशेष धोरण आखून त्यांना चांगल्या पदांवरील सरकारी नोकऱ्या, आर्थिक सहाय्य आणि मानधन उपलब्ध करून द्यावे. पालकांच्या पश्चातही त्यांच्या जगण्याची आबाळ होणार नाही, याची हमी शासनाने द्यायला हवी. यावेळी साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजच्या काळात नैराश्य, मानसिक ताण आणि नकारात्मक विचारांमुळे तरुण पिढी अनेक समस्यांना सामोरी जात आहे. अशा परिस्थितीत अपंगत्वावर मात करून यश संपादन करणारी दिव्यांग मुले आणि त्यांना घडवणारे पालक समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अशा यशस्वी दिव्यांग तरुणांचे कर्तृत्व समाजासमोर आणण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला साहित्यिक डॉ. संगीता बर्वे, उदय जगताप, सचिन पवार, विक्रम गोगावले, हर्षद नवले, नरेंद्र व्यास, विनायक इंगवले, गोविंदा वरण दाणी, अमित जाधव, तसेच विविध मंडळाचे अध्यक्ष व आयोजक पियुष शाह, किरण सोनिवाल, सुधीर ढमाले, प्रल्हाद थोरात, ऋषिकेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
Source link
दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे साधन द्यावे: राहुल देशमुख:समाजसेवक राहुल देशमुख यांची सरकारकडे मागणी, पितृदिनानिमित्त विशेष कार्यक्रम