![]()
अकोला आषाढी वारीनिमित्त विठू माउलीच्या भेटीला निघालेल्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे मंगळवारी शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, “गण गण गणात बोते’, “विठ्ठल विठ्ठल’, “ज्ञानेश्वर माऊली’ आणि “जय हरी विठ्ठला’च्या गजराने शहर दुमदुमून गेले. ७०० वारकरी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा अविस्मरणीय ठरला. सकाळी ८ वाजता डाबकी रोड परिसरात पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर डाबकी रोड, जुने शहर, विठ्ठल मंदिर, काळा मारोती मंदिर, सिटी कोतवाली, गांधी चौक आणि चिवचिव बाजार मार्गाने पालखीने शहरात ४ किलोमीटरचा प्रवास केला. सायंकाळी ४.३० वाजता मुंगीलाल बाजोरिया मैदानात पहिल्या दिवसाच्या मुक्कामस्थळी प्रवेश केला. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषाच्या वातावरणात भाविकांनी महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. ‘शेगावीचे गजानन आले, माझे मन मंदिर झाले’ तसेच विठ्ठल भक्तीने ओतप्रोत भरलेल्या भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. पालखी मार्गावरील वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्था व नागरिक सहभागी झाले. पिण्याचे पाणी, शीतपेय, फराळ, तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. श्री संत गजानन महाराज संस्थानची पंढरपूर पायदळ वारी यंदा ५७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. २१ जून रोजी शेगाव येथून पालखीने प्रस्थान केले. पारस आणि भौरद येथील मुक्काम पूर्ण करून अकोल्यात दाखल झालेल्या या पालखीच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ८ वाजता डाबकी रोडवर पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वे मार्ग बंद असल्याने पूलावरून पालखीचे आगमन झाले. सकाळी १०.३० वाजता दर्शनासाठी उसळलेल्या जनसागरात पालखी खंडेलवाल शाळेत दाखल झाली. दुपारी १२ वाजता वारकऱ्यांच्या विश्रांतीनंतर पालखीने जुन्या शहरातून पुढील प्रवास सुरू केला. दुपारी ३ वाजता गांधी चौकात व्यापारी व नागरिकांनी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले. सायंकाळी ४.३० वाजता पालखी मुंगीलाल बाजोरिया मैदान येथे पहिल्या दिवसाच्या मुक्कामासाठी पोहोचली.
Source link
संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागताकरिता जमला भक्तांचा मेळा:हजारो भाविकांनी घेतले ‘याची देही, याची डोळा’ दर्शन