![]()
पुण्यात ‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ऑनलाईन चित्रपट आणि व्हिडिओंना रेटिंग देऊन पैसे कमवण्याचे आमिष दाखवून एका आयटी प्रोफेशनला ४ लाख ९ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत टेलिग्रामवरील टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने एका नागरिकाला २ लाख ८७ हजार ७१९ रुपयांना गंडा घातला गेला. एरंडवणे येथील गौरव शिरीष आळेकर (वय ३८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २१ ते २२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आरोपींनी त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील केले. त्यानंतर प्ले स्टोअरवरून टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करण्यास सांगून ‘ॲन्थनी’ नावाच्या युझरशी संपर्क साधायला लावला. सुरुवातीला आयएमडीबी ॲपवर रेटिंग देण्याच्या बदल्यात १०० रुपये कमिशन देऊन आरोपींनी आळेकर यांचा विश्वास संपादन केला. विश्वास संपादन झाल्यानंतर, आरोपींनी आळेकर यांची एकूण ४ लाख ९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी टेलिग्राम आयडीधारक, व्हॉट्सअॅप ग्रुप वापरकर्ते आणि बँक खातेधारक अशा अज्ञात आरोपींविरोद्धात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता पाटील करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक येथील मनीष जगदीश तिवाडी (वय ४८) यांची २ लाख ८७ हजार ७१९ रुपयांची फसवणूक झाली. १५ ते २३ मे २०२६ या कालावधीत आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर टास्कसंदर्भात मेसेज पाठवून टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. इतरांना मिळणाऱ्या नफ्याचे खोटे स्क्रीनशॉट्स दाखवून सुरुवातीला छोटे टास्क देऊन पैसे दिले. यामुळे तिवाडी यांचा विश्वास बसला आणि त्यानंतर त्यांची २ लाख ८७ हजार ७१९ रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ‘संतोष गौर’ नावाचा टेलिग्राम आयडी धारक आणि युपीआय आयडी वापरकर्त्या अज्ञात आरोपींवर येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी कारंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
वर्क फ्रॉम होम बहाण्याने तरुणाला ४ लाखांचा गंडा:ऑनलाईन चित्रपट रेटिंगच्या आमिषाने फसवणूक