Headlines

स्वच्छतेची जबाबदारी केवळ मनपाची नसून प्रत्येक नगरकरांचीही- महापौर:शाहू महाराज जयंतीनिमित्त अभियान; सक्कर चौक परिसराची केली साफसफाई‎




छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरभर विशेष स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. “स्वच्छतेमुळे शहराचे सौंदर्य वाढतेच, शिवाय नागरिकांचे आरोग्यही सुदृढ राहते. ही जबाबदारी केवळ महापालिकेची नसून प्रत्येक नगरकरांची आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. यापुढे प्रत्येक दहा दिवसांनी शहरातील विविध भागांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आल्यानंतर सक्कर चौक येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी मनपा आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक सुरेश बनसोडे, महेश तवले, मयूर बांगरे, प्रकाश भागानगरे, रेवन्नाथ पवार, गोरख पडेाळे, सुरज कोतकर यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर गाडे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता करत अभियानाची सुरुवात केली. आमदार संग्राम जगताप हे शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सातत्याने स्वतः रस्त्यावर उतरून मोहिमेत सहभागी होत असून प्रशासनाला गती देत असल्याचे महापौरांनी आवर्जून सांगितले. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व्यापक स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. आपले शहर कचराकुंडीमुक्त झाले असल्यामुळे रस्त्यांवर कुठेही कचराकुंडी दिसणार नाही. मात्र, काही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकून ढीग निर्माण करतात, ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. सर्वांनी कचरा केवळ घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले. तसेच संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय “ॲक्शन मोड’ आणि लोकसहभाग मनपा आयुक्त यशवंत डांगे हे दररोज सकाळी शहराची पाहणी करत असून आढळलेला कचरा तातडीने उचलण्याच्या सूचना प्रशासनाला देत आहेत. स्वतः फिल्डवर उतरून ते काम करत आहेत. घंटागाडीचाच वापर करा: दैनंदिन स्वच्छता मनपा करत आहे; पण नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता तो घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *